Thu, Jun 20, 2019 21:38होमपेज › Vidarbha › तटकरेंनी दिला विषप्राशनाचा इशारा

तटकरेंनी दिला विषप्राशनाचा इशारा

Published On: Jul 14 2018 12:57AM | Last Updated: Jul 14 2018 12:57AMनागपूर : प्रतिनिधी

राज्यातील शालेय शिक्षण विभागाने प्रकाशित केलेल्या सहावीच्या भुगोलाच्या पुस्तकात सात पाने मजकूर गुजराती भाषेत  छापून आल्याप्रकरणी आज विरोधकांनी विधानपरिषदेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होऊन दोनदा कामकाज तहकूब करावे लागले आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. विशेष म्हणजे सभागृहाचे नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते सुनील तटकरे यांच्या आरोपप्रत्यारोप आणि विष घेऊन आत्महत्या करण्याच्या इशार्‍याने सभागृहात तणावाची स्थितीही निर्माण झाली होती. 

आज प्रश्‍नोत्तरांचा तास संपताच राष्ट्रवादीचे गटनेते सुनील तटकरे यांनी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहाला सांगितले की राज्यशासनाने प्रकाशित केलेल्या सहावीच्या भुगोलाच्या मराठी भाषेतील पुस्तकात सात पाने गुजराथीची छापलेली दिसून आलेली आहे. अशी अंदाजे एक लाख पुस्तके राज्यात विकली गेली असून हा राज्यातील मराठी भाषिकांचा अपमान असल्याचा दावा तटकरे यांनी केला. तटकरेंनी ही माहिती देताच सभापती रामराजे निंबाळकर यांनी सरकारने या बाबत माहिती घेवून निवेदन करावे असे निर्देश दिले.

मात्र या निर्देशाने समाधान झाले नाही परिणामी विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढतो आहे असे बघून सभापतींनी कामकाज 35 मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृहाचे पुन्हा कामकाज सुरू होताच काँगे्रसचे भाई जगताप उठून उभे राहिले आणि त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आम्हाला सरकारचा खुलासा नको तर माफी हवी अशी मागणी केली. दरम्यान सभागृहाचे नेते महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी असे काहीही घडले नाही असे ठणकावून सांगत एकत्र छपाई आणि बाइडिंग झाले असल्याने अनवधानाने एखाद दुसरे पुस्तक असे झाले असेल असा खुलासा केला.

दुसर्‍या तहकुबीनंतर कामकाज सुरू झाले तेव्हा चंद्रकांतदादा पाटील यांनीही पुस्तकाची एक प्रत आणली होती. या प्रतीमध्ये एकही गुजराथीचे पान नाही असे स्पष्ट करीत ही बाइडिंगमधलीच गडबड असावी अशी शंका व्यक्त केली. अशी गुजराथीची पाने तुम्हीच जोडली असतील असा आरोप चंद्रकांतदादांनी केल्याने सभागृहातील विरोधी सदस्य चांगलेच आक्रमक झाले. या दरम्यान विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी हे पुस्तक अहमदाबादच्या एका छापखान्यात छापले गेले याकडे लक्ष वेधले. यावर बरीच वादावादी झाली.

सभापती रामराजेंनी झाला प्रकार विद्यार्थ्यांच्या दुष्टीने घातक असून या प्रकरणाची सोमवारपर्यंत शहानिशा करावी आणि सभागृहात निवेदन करावे असे निर्देश शासनाला दिले. याच दरम्यान सुनील तटकरे उठून उभे राहिले आणि त्यांनी गुजराथी पाने तुम्हीच जोडले असतील या आरोपाचा चांगलाच समाचार घेतला. माझ्या राजकीय आयुष्यात अशाप्रकारे कुठलेही गैरप्रकार मी केले नाहीत असे स्पष्ट करीत हा आरोप तुम्ही सिद‍्ध केल्यास मी इथे सभागृहातच विष घेऊन आत्महत्या करीन असा इशारा सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दिला.