Tue, Apr 23, 2019 06:36होमपेज › Vidarbha › ताडोबा अभयारण्यात व्याघ्रदर्शन महागले

ताडोबा अभयारण्यात व्याघ्रदर्शन महागले

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 10 2018 1:41AM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेश शुल्क अवास्तव वाढवल्याने येथे पर्यटन करणे आता सर्वसामान्यांसाठी एक स्वप्नच राहणार आहे. यापूर्वी 700 ते 1000 रुपये असलेले शुल्क आता 4 ते 8 हजार रुपयांवर नेल्याने पर्यटकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.  

वाघ पाहणे हा सर्वांच्याच आवडीचा विषय असतो. बच्चेकंपनीसाठी तर हे एक प्रकारचे साहसच असते. त्यामुळेच सुट्टी काळात कुटुंबांची पावले व्याघ्र प्रकल्पाकडे वळतात. मात्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशशुल्क वाढवून वन खात्याने सर्वसामान्य नागरिकांच्या व्याघ्रदर्शन इच्छेवर एक प्रकारे बोळाच फिरवला आहे.  

आता वीकेंडला शनिवारी आणि रविवारी ते 8 हजार रुपये करण्यात आले आहे. तर इतर दिवशी 4 हजार रुपये एवढे शुल्क आकारले जाणार आहे. जिप्सीचे चार्जेस 2200 रुपये आणि गाईडचे 300 रुपये आहेत. म्हणजेच वीकेंडला ताडोबात व्याघ्रदर्शनासाठी 10 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत. व्याघ्रदर्शनासाठी 120 दिवस आधीच ऑनलाईन बुकिंग करण्याची सोयही सुरू करण्यात आली आहे. 

प्रवेशशुल्कात अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने सर्वसामान्यांनी पर्यटनासाठी येऊ नये का? असा सवाल व्याघ्रप्रेमी विचारत आहेत.