होमपेज › Vidarbha › सुरेश धस यांनी पुन्हा साधला अमरसिंह पंडितांवर निशाणा

सुरेश धस यांनी पुन्हा साधला अमरसिंह पंडितांवर निशाणा

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 18 2018 1:48AMनागपूर : चंदन शिरवाळे

बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांच्यातील राजकीय शत्रुत्वाच्या तोफा नागपूरमधील पावसाळी अधिवेशनात धडाडात आहेत. गेल्या आठवड्यात धस यांनी पंडित यांच्यावर टीका केल्यानंतर मंगळवारी पुन्हा पंडितांवरच निशाणा साधला. दोन्ही बाजुंकडुन आरोप- प्रत्यारोपांचे धुमशान सुरु असतानाच धस यांनी  उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यावर एकतर्फी भूमिका घेत असल्याचा आरोप केल्यामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. धस यांच्या दिलगिरीनंतर कामकाज पुन्हा सुरु झाले.

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मांडलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयकावर बोलताना धस यांनी पंडित यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. ते म्हणाले, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन असताना पंडित यांनी बँकेच्या मुख्यालय इमारत नुतनीकरणावर गरजेपेक्षा जादा खर्चाची तरतूद केली. आपण त्यावेळी संचालक होतो. पण याबाबत झालेल्या बैठकीत या खर्चाला आपण मान्यता न देता बैठकीतून बाहेर पडलो. आज सभागृहात सहकार विधेयकावर बोलणार्‍यांवर विविध प्रकारचे सोळा गुन्हे दाखल आहेत, असा आरोप धस यांनी करताच सभागृहात अशांततेची ठिणगी पडली.

पंडित यांच्यावर निशाणा साधत असतानाच धस यांनी उपसभापती ठाकरे यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला. मी आपला दुश्मन आहे काय. पहिल्या दिवसापासून आपण मला बोलु देत नाहीत. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असून, आपण विरोधकांच्या तालावर कामकाज करत आहात, असा आरोप धस यांनी करताच ठिणगीचा भडका उडाला आणि थेट विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि धस यांच्यात कलगीतुरा रंगला.

मुंडे म्हणाले, मी आठ वर्षांपासून सभागृहात असून सभापती किंवा उपसभापतींवर आतापर्यंत कोणी अशा प्रकारचा आरोप केला नाही. मंत्र्यांसमक्ष उपसभापती आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांचा अवमान होत असताना संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट शांत बसून आहेत. उपसभापतींवर आरोप करणे हा सदनाचा अवमान आहे. त्यांच्यावर आरोप करणे ही कोणती पध्दत आहे. बहुमताने आलात असे समजू नका. सत्ताधारी गटाचे असेच वागणे असेल तर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची आपली इच्छा नाही. जोपर्यंत धस माफी मागत नाहीत, तोपर्यंत कामकाज होणार नाही, असा इशारा मुंडे यांनी दिला.

त्यावर बापट यांनी धस यांची बाजु घेण्याचा प्रयत्न केला. उपसभापतींचा अवमान करण्याची त्यांची इच्छा नाही. आपला गैसमज झाला असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, अशी भावना बापट यांनी व्यक्त केली. मात्र, धस यांनीच उपसभापतींची माफी मागावी, अशी भूमिका घेतल्याने कामकाज दहा मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले.कामकाज सुरु झाल्यानंतर धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. माझ्याकडुन चुकीचे शब्द गेले असून आपण असे बोलायला नको होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यानंतरही त्यांनी अमरसिंह पंडित यांच्यावर आरोपांचे तोफगोळे सुरुच ठेवल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला. अखेरीस वेळ संपल्याचे सांगुन उपसभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.