Sun, Sep 23, 2018 04:49



होमपेज › Vidarbha › बीडमधील राजकीय वैर नागपुरात

बीडमधील राजकीय वैर नागपुरात

Published On: Jul 12 2018 1:44AM | Last Updated: Jul 12 2018 1:44AM



नागपुर : चंदन शिरवाळे

भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अमरसिंह पिंंडत यांच्यामध्ये बुधवारी भर सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक झाली. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर बोलताना धस यांनी पिंंडत यांच्या नेतृत्वाखालील विविध सहकारी संस्थांनी केलेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवल्यावरून या दोघांमध्ये वाढत असलेली खडाजंगी पाहून उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाजाची वेळ संपल्याचे जाहीर केले. अन्यथा सभागृहाचा आखाडा झाला असता.

राज्यातील शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांसदर्भात विरोधी पक्षांच्या वतीने नियम 260 अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना पंडित यांनी सरकारच्या शेतकरी धोरणावर टीका केली. ते म्हणाले, शेतकर्‍यांसाठी सरकारने पीकविमा योजना लागू केली असली तरी विमा कंपनी विविध कारणे सांगून शेतकर्‍यांना विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. सरकार आणि शेतकर्‍यांनी 2017 मध्ये सुमारे 3622 कोटी रुपयांचा विमा उतरविला होता. पण शेतकर्‍यांना केवळ 1460 कोटी रुपयांचे वाटप केले. पीकविमा कंपनी हा नवा धंदा झाला आहे. याविरोधात कुठेही तक्रार करता येत नाही.

बोगस बियाणांची विक्री करणार्‍या एकाही कंपनीवर सरकार कारवाई करत नाही. शेतकर्‍यांसाठी ऑनलाईन पध्दत जाचक ठरत असून ऑनलाईनमुळे दलाल निर्माण झाले आहेत. प्लास्टिकबंदी करून सरकारने दूध उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढवली आहे. आता तुमचा हिसाब लिहिला जात असून 2019 च्या निवडणुकांमध्ये तो चुकता करण्यासाठी शेतकरी आतुर झाला असल्याचे खडे बोल पंडित यांनी सत्ताधार्‍यांना सुनावले. त्यांच्यानंतर रामहरी रुपनवर यांनीही सत्ताधार्‍यांवर निशाणा साधत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका केली.