Tue, Apr 23, 2019 21:36होमपेज › Vidarbha › नक्षलवाद कमी करण्यात यश : अनुपकुमार 

नक्षलवाद कमी करण्यात यश : अनुपकुमार 

Published On: Aug 28 2018 9:27PM | Last Updated: Aug 28 2018 8:50PMनागपूर : प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद होता. याचे मुख्य कारण म्हणजे त्या क्षेत्रातील विकासाकडे झालेले दुर्लक्ष. मात्र, मागील काळात गडचिरोली जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली. याचा परिणाम म्हणून आज नक्षलवादासारखा जटील प्रश्नही सोडविता आला. या विकासामुळेच गडचिरोलीतील नक्षलवाद कमी करण्यात यश मिळाल्याचे मत्स्य, दुग्ध विकास व पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांनी सांगितले. प्रेस क्लबमध्ये सोमवारी आयोजित ’मीट द प्रेस’मध्ये पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र उपस्थित होते. 

अनुप कुमार यांनी सांगितले की, विभागीय आयुक्त म्हणून साडेचार वर्षाचा सर्वाधिक कालावधी मिळाला. या काळात शासनाने अनेक जबाबदार्‍या दिल्या होत्या. सरकारने माझ्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. विभागीय आयुक्त आणि इतर ठिकाणी मी केलेले कार्य समाधानकारक राहिले, असे मी मानतो. यात मला शासनासोबतच जनतेचेही सहकार्य मिळाले. विदर्भासोबतच मराठवाड्याच्या विकासाची जबाबदारीही माझ्यावर आली. लोकांचा रोजगार कसा वाढेल, इंटस्ट्रीयल वीजदर, साझा समिती आदींबाबतचे अहवाल शासनाला सादर केले. हे सर्व अहवाल शासनाने मान्य करीत अंमलबजावणी केली. हे सर्व अनुभव अनुपकुमार यांनी यावेळी सांगितले. 

वैदर्भीय नागरिकांचे प्रेम विसरणे अशक्य आहे, अशी भावनिक कबुली त्यांनी यावेळी दिली. विदर्भ मागास आहे, असा समज होता. येथे येण्याचे अधिकारी टाळत होते. मात्र, आता परिस्थिती बदली आहे. मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असून अनेक कंपन्या येथे येत असल्याचे ते म्हणाले.