Thu, Jul 18, 2019 12:16होमपेज › Vidarbha › नागपूर आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्याचे घृणास्पद रॅगिंग

नागपूर आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्याचे घृणास्पद रॅगिंग

Published On: Feb 28 2018 7:07PM | Last Updated: Feb 28 2018 7:06PMनागपूर : प्रतिनिधी

नागपूर शहरातील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात राहून डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या एका विद्यार्थ्याच्या अंगावर मूत्र विसर्जन करून ढेकूण मारण्याच्या औषधाच्या बाटलीतून त्याला मूत्रही पाजण्यात आले. यामुळे विद्यार्थ्याची प्रकृती अस्वस्थ झाली असून, त्याच्यावर सीताबर्डीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विष्णू भारत पवार असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो हनुमाननगर येथील श्री आयुर्वेद कॉलेजमध्ये बीएएमएसच्या द्वितीय वर्षाला शिकतो. चार महिन्यांपासून या वसतिगृहात राहतो. रॅगिंगच्या या घटनेनंतर विष्णूची प्रकृती खालावली. काही विद्यार्थ्यांनी त्याला मेडिकलमध्ये भरती केले. दुसर्‍या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विष्णूची प्रकृती बिघडल्याचे त्याच्या वडिलांना सांगितले. विष्णूच्या वडिलांनी ही माहिती विष्णूची नातेवाईक रेखा काळे यांना दिली. रेखा काळे या पोलिस दलात कार्यरत आहेत. माहिती मिळताच रेखा नागपूरला आल्या.

विष्णूची प्रकृती लक्षात घेता त्याला खासगी दवाखान्यात भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यावर मेडिकलमध्ये हजर असलेल्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. परंतु, काळे यांनी विष्णूला येथील सीताबर्डी येथील खासगी रुग्णालयात भरती केले. आदिवासी विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली. दरम्यान, आदिवासी कल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी आणि इतर अधिकार्‍यांनी विष्णूची भेट घेऊन त्याची तक्रार लिहून घेतल्याची माहिती आहे.

कुकडे ले-आउटमधील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात दर शनिवारी रॅगिंग होते. सीनियर्स असलेले विद्यार्थी 205 क्रमांकाच्या खोलीत एकत्र येतात. तेथे ज्युनियर विद्यार्थ्यांना बोलवून त्यांना मारहाण केली जाते. त्यानंतर अनेक घाणेरडे प्रकार विद्यार्थ्यांसोबत केले जातात. यात उठाबशा काढणे, सर्वांच्या पाया पडणे, नग्‍न होऊन नृत्य करायला लावणे, अंगावर मूत्र विसर्जन करणे किंवा पाजणे, हिवाळ्यात थंड पाणी टाकणे असे प्रकार होतात, असे विष्णूने सांगितले. याप्रकरणी शासकीय स्तरावर काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.