Tue, Aug 20, 2019 15:10होमपेज › Vidarbha › 'त्‍या' वक्‍तव्याप्रकरणी तीन आमदारांना राज्‍य महिला आयोगाची नोटीस 

'त्‍या' वक्‍तव्याप्रकरणी तीन आमदारांना राज्‍य महिला आयोगाची नोटीस 

Published On: Apr 24 2019 4:45PM | Last Updated: Apr 24 2019 4:45PM
राजुरा (चंद्रपूर) : पुढारी ऑनलाईन

चंद्रपूरचे आमदार विजय वड़ेवटीवार, आमदार बाळू धानोरकर, सुभाष धोटे यांना लैगिक शोषण घटनेप्रकरणी असंवेदनशील वक्‍तव्य केल्‍याने राज्‍य महिला आयोगाने नोटीस बजावली. तसेच या नोटीशीमध्ये ३० एप्रिल रोजी आयोगाच्या कार्यालयात  हजर राहण्यास सांगितले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की, चंद्रपूर जिल्‍ह्‍यातील राजूरा येथील इन्फंट जिजस इंग्‍लिश सार्वजनिक शाळेच्या वसतिगृहातील अल्‍पवयीन मुलीवर लैंगिक अत्‍याचाराची घटना घडली होती. याबाबत राज्‍य महिला आयोगाकडून २० एप्रिल रोजी चंद्रपूरच्या पोलिस अधिक्षकांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

या प्रकरणी शासकीय मदत मिळविण्याच्या हेतूनेच पीडित मुलीच्या पालकांकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे, असे वक्‍तव्य माध्यम प्रथिनिधींना दिलेल्‍या मुलाखतीत केल्‍याचे समोर आले आहे. या मुलाखतीचे व्हिडिओ क्‍लिप समाज माध्यमात प्रसारित होत आहेत. तसेच आमदारांनी केलेले विधान २३ एप्रिल २०१९ रोजीच्या वृत्‍तपत्रामध्येही छापून आले आहे. त्‍यामुळे हे विधान अल्‍पवयीन मुलीच्या आणि पालकांच्या हेतूवर संशय घेणारे आहे. हे गंभीर स्‍वरूपाचे आहे असे राज्‍य महिला आयोगाने म्‍हटले आहे. 

अल्‍पवयीन मुलीवर झालेल्‍या लैगिक अत्‍याचारांच्या तक्रारींची सत्‍यता पडताळण्याचे काम संबंधित तपास यंत्रणांचे व मा न्यायपालिका यांचे आहे. त्‍यांचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच अशाप्रकारे या विषयावर प्रतिक्रिया देणे, वक्‍तव्य करणे, ही बाब अल्‍पवयीन मुलींवरील अत्‍याचाराची अवहेलना करणारी आहे. असे सकृत दर्शनी दिसते. असेही आयोगाने आमदार धानोरकर यांना पाठविलेल्‍या नोटीशीमध्ये म्‍हटले आहे. 

त्‍यामुळे  आयोगाने आमदारांना ३० एप्रिलला सकाळी ११.००  वाजता आयोगाच्या कार्यालयात हजर राहून या विषयीचा खुलासा करावा असे सांगितले आहे.