नागपूर : प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यात डोंगरदर्यांच्या पायथ्याशी राहणार्या आदिवासी तरुणी लवकरच मुख्य मार्गावर एस.टी. बस चालवताना दिसणार आहेत. या तरुणींच्या हाती महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या लालपरीचे सारथ्य करण्याची जबाबदारी देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केला.
मुंबई येथील केंद्रीय बसस्थानकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने जिल्ह्यातील आदिवासी समाजातील 23 तरुणींना एस.टी. बसच्या चालकपदी विराजमान करण्याच्या निर्णयाची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील सेंट्रल बसस्थानकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली. जिल्ह्यात पांढरकवडा येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालक प्रशिक्षण केंद्र आहे. आदिवासी मुलांसोबतच या समाजातील शिकलेल्या मुली गाव, घराबाहेर पडाव्यात म्हणून त्यांनाही एस.टी. महामंडळात चालक म्हणून नियुक्ती देण्याची संकल्पना संजय राठोड यांनी दिवाकर रावते यांच्यासमोर मांडली होती.
रावते यांनीही या संकल्पनेला मूर्त रूप देण्याची जबाबदारी संजय राठोड यांच्यावर सोपविली. यवतमाळ जिल्ह्यापासूनच या उपक्रमाची सुरुवात करू, असे सांगत कामाला लागण्याचे आदेश त्यांनी राठोड यांना दिले. चालकपदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पडताळून प्राथमिकस्तरावर जिल्ह्यातील 23 तरुणींना या उपक्रमासाठी निवडण्यात आले. शनिवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने या तरुणींच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली. यावेळी शासकीय सोपस्कारांनंतर एस.टी. महामंडळात या तरुणींचा महिला चालक म्हणून सुरू होणारा प्रवास राज्याच्या इतिहासातील गौरवशाली क्षण ठरेल, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.