Fri, Sep 21, 2018 16:13



होमपेज › Vidarbha › रुजू न होणाऱ्या डॉक्टरांची सेवा संपुष्टात : आरोग्य संचालक 

रुजू न होणाऱ्या डॉक्टरांची सेवा संपुष्टात : आरोग्य संचालक 

Published On: Sep 03 2018 10:02PM | Last Updated: Sep 03 2018 10:02PM



नागपूर : प्रतिनिधी

सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय सेवेतील ७२३ पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यातील सर्वाधिक पदे विदर्भातील आहे. विशेष म्हणजे, जे डॉक्टर १० दिवसांत रुजू होणार नाहीत अशा डॉक्टरांची सेवा संपुष्टात आणून प्रतीक्षा यादीतील डॉक्टरांना संधी दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य सेवेचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिली.

विदर्भासह आजूबाजूच्या राज्यात वाढत असलेल्या स्क्रब टायफसला घेऊन डॉ. कांबळे यांनी आज रविवारी नागपूरच्या उपसंचालक आरोग्य विभागाच्या कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर डॉ. कांबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी कांबळे म्हणाले, आरोग्य विभागात गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेसाठी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पुढाकार घेतल्याने राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील वर्ग’अ’ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदभरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ७२३ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी कार्यालयात सुमारे साडेतीन हजार अर्ज आले आहेत. यामुळे या जागेवर डॉक्टराची नियुक्ती झाली आणि ते १० दिवसांत रुजू झाले नाहीत, तर त्या जागी प्रतीक्षा यादीतील डॉक्टरांची वर्णी लावली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्क्रब टायफसवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वोतोपरी प्रयत्न होत आहे. या रोगाची गंभीर दखल आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी घेतली आहे. त्यांच्या सूचनेनुसार उपाययोजना सुरू आहेत. स्क्रब टायफस संशयित रुग्ण आढळून येताच ’डॉक्सीसायक्लीन’ हे औषध देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेडिकलमध्ये ’एलायझा’ चाचणी उपलब्ध करून देण्यात आली असून’डॉक्सीसायक्लीन’ औषधेही देण्यात आली आहेत. शिवाय, लोकांची जनजागृतीसाठी पत्रके वाटण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स्क्रब टायफस नियंत्रणात आला आहे. या रोगामुळे आतापर्यंत ४१ रुग्णांतील ११ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३१ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून, उर्वरित ११ रुग्ण हे मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातील आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या ’कंट्रोल रूम’मध्ये संसर्गजन्य आजाराची नोंद घेतली जाते.आता यात ’स्क्रब टायफस’चीही नोंद घेतली जाणार असून, त्यावरील उपाययोजनांना प्राधान्य दिले जाणार आहे. या रोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, आयूषचीही मदत घेतली जाणार आहे.