Mon, Aug 19, 2019 18:31



होमपेज › Vidarbha › नागपुरात बॉक्सिंग प्रशिक्षण सुरू करणार - गडकरी

नागपुरात बॉक्सिंग प्रशिक्षण सुरू करणार - गडकरी

Published On: Sep 03 2018 10:02PM | Last Updated: Sep 03 2018 10:02PM



नागपूर : प्रतिनिधी

दिवसेंदिवस बॉक्सिंग हा खेळ लोकप्रिय होत आहे. या खेळामध्ये युवकांचा सहभागही वाढत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंगमध्ये देशाची पदक संख्या वाढावी यासाठी खेळाडूंना अद्ययावत सुविधा मिळणे आवश्यक आहे. यामुळे नागपुरात साकारत असलेल्या १५० कोटींच्या ’स्पोट्रर्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ (साई) च्या केंद्रामध्ये बॉक्सिंगचा समावेश करून याठिकाणी बॉक्सिंग प्रशिक्षण सुरू करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 

नागपूर महानगरपालिका, नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित देशातील पहिली महापौर चषक सबज्युनिअर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग स्पर्धेचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. सिव्हिल लाइन्स येथील राणी कोठी येथे आयोजित उद्घाटन समारंभाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

या स्पर्धेतील सबज्युनिअर मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खुशी व जान्हवी यांनी विविध वजनी गटात विजयी सलामी दिली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी चांगली सुरुवात केली. स्पर्धेत ३६ ते ३८ किलो वजन गटात महाराष्ट्राच्या खुशीने झारखंडच्या गीताला पराभूत करत विजयी सुरुवात केली, तर दुसरीकडे ४० ते ४२ वजन गटात महाराष्ट्राच्या जान्हवीने प्रतिस्पर्धी मध्यप्रदेशच्या राधिका टेकानला पराभूत केले. दुसरीकडे इतर लढतींमध्ये हरयाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, तेलंगणच्या अन्य बॉक्सर्सनी त्यांच्या लढतीत सहज विजय मिळवले.