Wed, Apr 24, 2019 07:31होमपेज › Vidarbha › नाणार हद्दपार करणारच; शिवसेना आमदारांचा इशारा

नाणार हद्दपार करणारच; शिवसेना आमदारांचा इशारा

Published On: Jul 07 2018 1:38AM | Last Updated: Jul 06 2018 11:21PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरीतील नाणार रिफायनरी जनभावनेच्या विरोधात आहे. हा प्रकल्प राज्य सरकारने रेटू नये. काही केले तरी हा प्रकल्प शिवसेना हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शुक्रवारी शिवसेना आमदारांनी देत विधानभवनाच्या पायर्‍यावर ठिय्या दिला. 

‘नाणार रद्द करा...’, ‘स्थानिकांना डावलून भाजप सरकारची दडपशाही सहन करणार नाही...’, ‘नाणार होऊ देणार नाही...’, ‘नाणार जाणारच..’ अशा गगनभेदी घोषणा देत शिवसेना आमदारांनी विधानभवन परिसर सकाळी दणाणून सोडला. नाणार प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर कोकणवासीयांच्या प्रक्षोभाला भाजपला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस मुसळधार पावसामुळे वाया गेला असताना सकाळी शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू, किशोर दराडे, वैभव नाईक, राजन साळवी आदी आमदारांनी विधानभवाच्या पायर्‍यांवर ठिय्या दिला. शिवसेना सदैव जनसामान्यांसोबत आहे. नाणार प्रकल्प हद्दपार झालाच पाहिजे, असा बॅनर झळकवत शिवसेना आमदारांनी प्रकल्पाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  

यावेळी सुनील प्रभू म्हणाले, स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली. आम्ही सरकारमध्ये असलो तरी नाणार प्रकल्पाला आमचा विरोधच राहील. केंद्र व राज्य सरकारने दबाव आणून हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर प्रक्षोभ होईल.  प्रकल्प लादल्यास कोकणवासीयांच्या प्रक्षोभाला भाजपला सामोरे जावे लागेल. त्यामुळे सरकारने सूज्ञपणा दाखवावा व नाणार प्रकल्प रद्द करावा, असेही ते म्हणाले.  नाणारबाबत शिवसेना योग्यवेळी दोन्ही सभागृहात भूमिका घेईल. नाणारला सभागृहातही शिवसेना विरोध करेल, अस स्पष्ट केले.

विधानभवन परिसरातील दारूच्या बाटल्या

एरव्ही विधानभवन परिसरात सत्ताधारी व विरोधकांमधील होणारी राजकीय चकमक नवीन नाही. या भवनाने अनेकदा असे दावे-प्रतिदावे अनुभवले आहेत व राजकारणाचे विविध रंगदेखील पाहिले आहेत. मात्र, शुक्रवारी चक्‍क दारूच्या बाटल्यांवरून राजकारण तापल्याचे दिसून आले.    शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विधानभवनातील सर्व ‘रेनप्रूफ’ व्यवस्था उघडी पडली. परिसरातील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून ज्यावेळी गटाराचे झाकण उघडण्यात आले, तेव्हा त्यात दारूच्या बाटल्या आढळल्या. या बाटल्या नेमक्या कुणाच्या कार्यकाळातील आहेत, यावरून आमदारांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाल्याचे दिसून आले.