होमपेज › Vidarbha › शिवस्मारकाच्या उंचीवरून पुन्हा गदारोळ; विधानसभा तहकूब

शिवस्मारकाच्या उंचीवरून पुन्हा गदारोळ; विधानसभा तहकूब

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 21 2018 12:18AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उंचीचा वाद शुक्रवारी विधानसभेत पुन्हा एकदा उफाळून आला. गुजरात राज्यात उभ्या राहणार्‍या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी ठेवण्यासाठीच उंची 34 मीटरने कमी केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. 

पुतळ्याची उंची कमी करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गदारोळ केल्यामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब झाले. त्यातच काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशी हुज्जत घालत राजदंडच उचलल्याने या गोंधळात भर पडली. त्यात प्रश्‍नोत्तराचा तास संपला. 

या मुद्द्यावर खुलासा करताना समुद्रात उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. मात्र, कोणाला संभ्रम राहू नये म्हणून पुतळ्याच्या उंचीबाबत विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन स्मारकाचे आराखडे सादर केले जातील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

प्रश्‍नोत्तराचा तास सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीचा विषय मांडला. महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली जाणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यानी सभागृहात दिले असले, तरी प्रत्यक्षात पुतळ्याची उंची 160 मीटरवरून 126 मीटर इतकी करण्यात आली आहे. सरकारने हे कुणासाठी केले, असा सवाल केला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करून त्यांना खुजे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो सहन करणार नाही, असा इशारा दिला.

पुतळ्याची उंची कमी करणे हे महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारे कृत्य आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हवेचे कारण सांगितले म्हणून उंची कमी करणे हा महाराष्ट्राचा अवमान असून, तो खपवून घेतला जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनीही या निर्णयावर टीका केली.