Thu, Aug 22, 2019 08:54होमपेज › Vidarbha › जातपडताळणीसाठी शिवसेनेच्या नगरसेवकाकडे मागितले पन्नास लाख

जातपडताळणीसाठी शिवसेनेच्या नगरसेवकाकडे मागितले पन्नास लाख

Published On: Jul 17 2018 1:37AM | Last Updated: Jul 17 2018 12:32AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक सगुण नाईक यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी  सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बड़ोले यांच्या नावे पन्नास लाख रूपयांची लाच मागितल्याचा आरोप शिवसेनेचे सदस्य अनिल परब यांनी सोमवारी विधानपरिषदेत केला. लाच मागणार्‍या अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करून पोलिसांनी त्यांना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली. सभागृहाच्या भावना विचारात घेऊन, सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी लाचेची मागणी करणार्‍या तीन अधिकार्‍यांच्या निलंबनाचे निर्देश दिले.

महाराष्ट्र अनुसूचित जाती-जमाती विमुक्त जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, व विशेष मागासवर्गीय विधेयक 2018  सुधारणा विधेयकावर चर्चा करताना परब यांनी ही मागणी केली. सगुण नाईक यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा चित्रा सुर्यवंशी, सदस्य अरविंद वळवी, अविनाश देवसाटकर या अधिकार्‍यांनी  50 लाख रुपयांची मागणी केली. आम्हाला आमच्या बदलीसाठी 1 कोटी रुपये द्यावे लागतात. मुंबईच्या नगरसेवकाला 50 लाख रुपये ही रक्कम जास्त आहे का, असा सवालही या अधिकार्‍यांनी नाईक यांना केल्याचे परब यांनी सभागृहात सांगितले.

या अधिकार्‍यांविरोधात आपल्याकडे ठोस पुरावे आहेत. कोणी मागणी केल्यास आपण ते देण्यास तयार आहोत. या अधिकार्‍यांविरोधात आपण बडोले त्यांच्याकडे तक्रार केली, पण काही झाले नाही.अखेरीस पैसे दिले नाहीत म्हणून नाईक यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे  या तिघांना निलंबित करून त्यांची चौकशी करा, अशी मागणीही परब यांनी केली. काँग्रेस, शेकाप व राष्ट्रवादीच्या सदस्यानीही परब यांना पाठिंबा देत लाचेची मागणी करणार्‍या अधिकार्‍यांवर  कारवाईची मागणी केली. 

शेकापचे सदस्य जयंत  पाटील यांनी मंत्र्यांच्या नावाने पैसे मागणार्‍यांना सभागृहात बोलवून कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले, वैध आणि अवैध अशी दोन्ही प्रमाणपत्रे या अधिकार्‍यांकडे तयार असतात. जो जादा पैसे देईल त्याला वैधता प्रमाणपत्र मिळते, पैसे दिले नाहीतर प्रकरण फेटाळले जाते. हे विधेयक जात पडताळणी समितीची वसुली वाढावी यासाठी आणले आहे का, असा सवालही त्यांनी केला.

भाजपचे सदस्य प्रवीण दरेकर म्हणाले, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक आदिवासी पाडे आहेत. पण अशिक्षित असल्यामुळे त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पुरावे नाहीत. त्यामुळे शासकीय योजनाचा त्यांना लाभ घेता येत नसल्यामुळे शासनाने त्यांना जात प्रमाणपत्र द्यावे, अशी सूचना दरेकर यांनी केली. राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी जात पडताळणी समित्या मनमानी करत असल्यामुळे अनेकांचे नुकसान होत आहे,  त्यामुळे  वेळेत प्रमाणपत्र न दिल्यास या समित्यांच्या विरोधात अपिलात जाण्याची तरतूद कायद्यात करावी, अशी मागणी पावसकर यांनी केली.