Thu, Jun 27, 2019 12:08होमपेज › Vidarbha › मनमोहनसिंगांवर आरोप करताना लाज वाटायला हवी : पवार 

मनमोहनसिंगांवर आरोप करताना लाज वाटायला हवी : पवार 

Published On: Dec 12 2017 4:42PM | Last Updated: Dec 12 2017 4:42PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

ज्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेला जगभरातून मान्यता मिळाली, अशा डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर अतिशय घाणेरडा आरोप करताना शरम वाटायला हवी होती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नागपुरात आज काढण्यात आलेल्या संयुक्त हल्लाबोल मोर्चात ते बोलत होते. 
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आरोप केले होते. अय्यर यांनी गुजरात निवडणुकीच्या चर्चेसाठी पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. त्यावेळी डॉ. मनमोहनसिंग देखील उपस्थित होते, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी एका जाहीर सभेत केला होता. या आरोपाला आज, शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

पवार म्हणाले, 'एका बाजूला देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न जेसे थे ठेवायचे. त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे आणि केवळ सत्ता टिकविण्यासाठी पाकिस्तानसारखा मुद्द पुढे करायचा. हा राजकारणातील अतिशय घाणेरडा प्रकार सध्या सुरू आहे. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे.' भाजपची सत्ता येऊन तीन वर्षे झाली. पण, कर्जमाफीचा पत्ता नाही. राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. यूपीएची सत्ता असताना विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागाचा दौरा, स्वतः मी, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासोबत केला होता, याची आठवण पवार यांनी भाषणात करून दिली. महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.