Sat, Apr 20, 2019 09:51होमपेज › Vidarbha › नागपूर : वसतिगृहात निवासी डॉक्टरांचे रॅगिंग

नागपूर : वसतिगृहात निवासी डॉक्टरांचे रॅगिंग

Published On: Aug 28 2018 9:27PM | Last Updated: Aug 28 2018 9:21PMनागपूर : प्रतिनिधी

यवतमाळ येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात सिनियर डॉक्टरांनी रॅगिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. या डॉक्टरांनी मध्यरात्री मुलींच्या वसतिगृहात जाऊन रूमचे दार ठोठावले. त्यामुळे मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या रॅगिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी डॉ. दामोधर पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नेमली आहे.

कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्याच वर्षी एका विद्यार्थ्याचे सिनियर विद्यार्थ्यांनी केलेले रॅगिंगचे प्रकरण चांगलेच गाजले होते. मात्र यावेळी निवासी डॉक्टरांचे त्यांच्या पेक्षा सिनियरनी रॅगिंग केल्याचे प्रकरण पुढे आले आहे.  वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. अँटी रॅगिंग कमिटीचे प्रमुख डॉ. प्रभाकर हिवरकर व महाविद्यालयातील इतर काही प्राध्यापक, वसतिगृहाचे वार्डन यांची बैठक घेतल्यावर या रॅगिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. दामोधर पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. 

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले डॉक्टर वसतिगृहात सिनीअर म्हणूनच वागत असतात. सिनीयर म्हणविणार्‍यांनी आपली दहशत निर्माण केली आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी रात्री वसतिगृहात निवासी डॉक्टरांचे रॅगिंग घेतल्याने वसतिगृहात एकाच गोंधळ उडाला. त्यामुळे वसतिगृहाचे वार्डन त्वरित वसतिगृहात आले व त्यांनी या सिनिअरला त्यांच्या वागणुकीबद्दल विचारले असता या सिनियरनी त्यांना दटावून जाण्यास सांगितले.

डॉक्टरांच्या रॅगिंगनंतर वसतिगृहाचे वार्डन यांनी सिनियर यांना हटकले, मात्र हे सिनियर येथेच थांबले नाही तर त्यांनी समोरच असलेल्या मुलींच्या वसतिगृहात जाऊन मध्यरात्री त्यांच्या रूमची दारे जोरजोराने ठोठावले. या सिनियरमध्ये राज्यस्तरावर असलेल्या संघटनेचे पदाधिकारी असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास कोणी पुढे येत नसल्याने त्यांची दहशत वाढतच आहे अशीही चर्चा आहे. निवासी डॉक्टरांचे रॅगिंग झाले असल्याचे समजल्यावर नियमाप्रमाणे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सात जणांची समिती नेमली आहे. या चौकशी समितीचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.­­