Mon, May 20, 2019 08:47होमपेज › Vidarbha › ज्येष्ठ नागरिक वयोमर्यादा आता ६५ वरून ६०

ज्येष्ठ नागरिक वयोमर्यादा आता ६५ वरून ६०

Published On: Jul 12 2018 1:44AM | Last Updated: Jul 11 2018 11:29PMनागपूर : विशेष प्रतिनिधी

राज्य सरकारचे रखडलेले ज्येष्ठ नागरिक धोरण अखेर जाहीर झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्‍नती आणि त्यांना ताणतणावातून मुक्‍त करून उत्तम आरोग्यासाठी त्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे.

या धोरणाच्या चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्‍तीचे निर्देश दिले असून, सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरून ६० वर्षे करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहायमंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी दिली. शासकीय निवास्थानी पत्रकारांना त्यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयांमध्ये ज्येष्ठांसाठी पाच टक्के खाटांची सोय ठेवण्यात आली असून, शासकीय रुग्णालयात त्यांना प्राध्यान्यक्रम देण्यात येणार आहे.

खासगी वैद्यकीय संस्था, रुग्णालये, ट्रस्ट यामध्ये ज्येष्ठ रुग्णांना 50 टक्के सवलत देण्याचे तसेच खासगी वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉक्टरांनी ज्येष्ठांना फीमध्ये सवलत द्यावी, असे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात वृद्ध चिकित्सेचा समावेश करण्यात आला असून, वैद्यकीय सेवा व मानसशास्त्रीय उपचार आणि समुपदेशनासाठी सामाजिक कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. निराधार व्यक्‍तींच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांना अंत्योदय योजनेच्या दराने धान्य देण्यात येणार असून, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येईल, रुग्णालयात ज्येष्ठ नागरिक चिकित्सा विभाग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र स्वागत कक्ष स्थापण्यात येणार आहे, असेही बडोले म्हणाले.