Tue, Jul 16, 2019 10:14होमपेज › Vidarbha › सावरकरांचे विचार देशभर पोहचवण्याची गरज : नितीन गडकरी

सावरकरांचे विचार देशभर पोहचवण्याची गरज : नितीन गडकरी

Published On: Aug 12 2018 8:27PM | Last Updated: Aug 12 2018 7:53PMनागपूर : प्रतिनिधी 

ज्या समाजासाठी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर श्रेष्ठ नाहीत तर कोणताच महापुरुष श्रेष्ठ होऊ शकत नाही. सावरकर कुटुंबीयावर या देशाने खूप अन्याय केला आहे. त्यांचे प्रखर राष्ट्रीय विचार संबंध देशभर पोहोचविण्याची गरज असून लाखे प्रकाशनाने हा विडा उचलावा, त्यासाठी मी स्वत: सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विदर्भ साहित्य संघ व लाखे प्रकाशनाच्या वतीने साहित्याचार्य महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी दिलेल्या महाभारतावरील व्याख्यानांच्या दोन खंडांचा व छत्रपती शिवाजी महाराजांवरील चार खंडांचा प्रकाशन सोहळा विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात पार पडला. यावेळी नितीन गडकरी प्रमुख पाहुणे  म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे उपाध्यक्ष डॉ. राजन जयस्वाल होते. तर, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. यशवंत पाठक उपस्थित होते. व्यासपीठावर चंद्रकांत लाखे व बाळशास्त्रींचे नातू ह.भ.प. श्याम हरदास उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, सावरकरांची ’माझी जन्मठेप’ ही कादंबरी नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरक आहे. सावरकरांनी देशासाठी आपले सर्वस्व वाहिले आणि कुटुंबच्या कुटुंब उद्धवस्त केले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देशाबद्दल समर्पित भावना ठेवणारा दुसरा कुणीही दिसत नाही. मात्र, अन्य गैरसमजामुळे त्यांना डावलले जात आहे. त्यामुळे त्यांची ’माझी जन्मठेप’ ही कादंबरी भारताच्या सर्व भाषेत पोहोचावी असेही ते म्हणाले. तर, भाषांतरासाठीची भाषेची समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करू असेही ते म्हणाले. सावरकरांचे जीवन संबंध देशात पोहोचविण्याचे आवाहन यावेळी गडकरी यांनी लाखे प्रकाशनाचे चंद्रकांत लाखे यांना केले. 

एकीकडे परकीय नागरिकांना देशात राहण्याचे अधिकार द्या, यासाठी संसदेत झेंडे दाखविले जातात आणि दुसरीकडे आपलाच समाज आपल्या विचारांची दखल घेत नाही, ही शोकांतिका असल्याचेही ते म्हणाले. हा देश साहित्याचा असून श्रेष्ठ विचार बहुजनांपर्यंत पोहोचविण्यात बुद्धिजिवी अपयशी ठरले असून, ही मंडळी अहंकारी आहे आणि त्यामुळेच समाजवादी तयार होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. विद्वानांमध्ये एकवाक्यता निर्माण होत नाही, हे दुर्दैव असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले.