Sat, Jul 20, 2019 21:32होमपेज › Vidarbha › ‘साहेबराव’ला मिळणार नवा पंजा!

‘साहेबराव’ला मिळणार नवा पंजा!

Published On: Feb 04 2018 1:57AM | Last Updated: Feb 04 2018 1:21AMनागपूर : प्रतिनिधी 

शिकार्‍यांच्या पिंजर्‍यात अडकल्याने पायाचा पंजा गमवावा लागलेल्या आठ वर्षीय साहेबराव या वाघाला लवकरच कृत्रिम पाय बसवण्यात येणार आहे. एका वाघाला कृत्रिम पाय बसवण्याची ही जगातली पहिली शस्त्रक्रिया ठरणार आहे. त्यासाठीच देशातील आघाडीचे ऑर्थोपेडिक सर्जन आणि महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे डॉक्टर एकत्र आले आहेत. 2012 मध्ये पिंजर्‍यात अडकल्याने साहेबरावला आपला पंजा गमवावा लागला होता, त्यावेळी तो दोन वर्षांचा होता. 

ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुश्रुत बाभुळकर यांनी साहेबरावला दत्तक घेतले आहे. त्याच्याबद्दल डॉ. बाभुळकर सांगतात की, यापूर्वी कुत्रे आणि हत्ती यांना कृत्रिम पाय बसवण्यात आले आहेत, मात्र वाघावर अशा प्रकारे शस्त्रक्रिया करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. मी पहिल्यांदा साहेबरावला लंगडताना पाहिले तेव्हा मला  फारच वाईट वाटले होते. एक पाय नसल्याने साहेबरावला वेदनापूर्ण आयुष्य जगावे लागत आहे. त्याची या वेदनेतून मुक्तता करण्यासाठीच त्याला कृत्रिम पाय बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. साहेबरावचे वजन 200 किलो असून तो भारतातील सर्वात मोठा वाघ आहे. 

लाडक्या साहेबरावसाठी डॉ. बाभुळकर यांनी जर्मनीहून एओ फाऊंडेशनमार्फत कृत्रिम पाय मागविला आहे. हे फाऊंडेशन मानव आणि प्राण्यांचे फ्रॅक्चर ठीक करण्यामध्ये तज्ज्ञ मानले जाते. काही वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर साहेबरावला सिलिकॉनपासून बनविलेला पाय बसवण्यात येणार आहे, जो अगदी खराखुरा वाटेल. विशेष म्हणजे प्राण्यांसाठीचा हा कृत्रिम पाय अशापद्धतीने तयार करण्यात आलेला आहे की, प्राणी तो स्वतःहून काढूही शकत नाहीत. तरीही पाय लावल्यानंतर कोणताही संसर्ग होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येणार असल्याचे डॉ. बाभुळकर सांगतात.