Tue, Apr 23, 2019 10:01होमपेज › Vidarbha › दोन पेट्रोल पंपादरम्यान 300 मीटरचे अंतर आवश्यक : HC

दोन पेट्रोल पंपादरम्यान 300 मीटरचे अंतर आवश्यक : HC

Published On: Jan 18 2018 10:10AM | Last Updated: Jan 18 2018 10:06AM

बुकमार्क करा
नागपूर : पुढारी ऑनलाईन

दोन पेट्रोल पंपादरम्यान 300 मीटरचे अंतर आवश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. याप्रकरणी दाखल याचिका न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. स्वप्ना जोशी यांनी निकाली काढली आहे. उज्ज्वला केंदरे असे याचिकाकर्त्या महिलेचे नाव आहे. रवींद्र ढाले यांना दुसरबीड, सिंदखेडराजा येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनतर्फे (बीपीसीएल) पेट्रोलपंप देण्यात आला. यापूर्वी ढाले यांनी ढोमगाव, मेहकर येथे रिटेल आऊटलेट डिलरशीप मिळण्याकरिता जाहिरातीनुसार अर्ज केला. परंतु योग्य जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तो पेट्रोलपंप मिळू शकला नाही. 

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने काढलेल्या जीआरनुसार अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांना एकदा भारतात कोणत्याही जागी जागा उपलब्ध करून दिल्यास डिलरशीप देण्याची तरतूद आहे. यासाठी स्वतंत्र जाहिरातीची गरज नाही. त्यानुसार स्वतंत्र जाहिरात नसताना ढाले यांना दुसरबीड, सिंदखेडराजा येथे बीपीसीएलची डिलरशीप देण्यात आली. परंतु सदर पेट्रोलपंप हा उज्ज्वला केंदरे यांच्या केंद्राच्या बाजूला म्हणजे 2.19 मीटर अंतरावर सुरू होणार होता. यामुळे मंत्रालयाच्या इंडियन रोड काँग्रेसच्या गाईडलाईननुसार सदर पेट्रोलपंप रस्त्याच्या एका बाजूला असल्यास हजार मीटरचे अंतर दोन पेट्रोलपंपदरम्यान असणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यातर्फे शेखर ढेंगाळे यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. परंतु दोन्ही पेट्रोलपंपातील अंतर तीनशे मीटर आहे आणि कार्यकारी अभियंत्याने परवानगी दिल्यावरून सदर पेट्रोलपंप सुरू करण्यास उच्च न्यायालयाने अनुमती दिली. उज्ज्वला केंदरे यांच्यातर्फे  शेखर ढेंगाळे यांनी बाजू मांडली.