Sun, Mar 29, 2020 07:32होमपेज › Vidarbha › गुढीपाडवा दिनी कोरोनावर विजय मिळविण्याचा आरएसएसचा संकल्प

गुढीपाडवा दिनी कोरोनावर विजय मिळविण्याचा आरएसएसचा संकल्प

Last Updated: Mar 25 2020 7:10PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी संपुर्ण जगासोबत भारतचाही लढा सुरू आहे. केंद्र सरकारनेही लॉकडाऊन सारख्या महत्वाच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोरोनाचा पराभव करून अशा असाध्य आजारावर विजय मिळविण्याचा संकल्प स्वयंसेवकांनी करून आपले सामाजिक दायित्व पुर्ण करण्याची ही वेळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.

 अधिक वाचा : नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ५ वर

"नववर्षांचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा". हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संकल्प दिवस असल्याचेही डॉ. भागवत यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा झपाट्याने होत असलेल्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशभरात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या निमित्तानं सरसंघचालकांनी आज संघ स्वयंसेवकांना संबोधित केलं. गुढीपाडव्याच्या आजच्या दिवशी कोरोनापासून मुक्ती देण्याचा संकल्प करून संघाचे कार्य निरंतर सुरू ठेवता येईल, असे मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना उद्देशून केलेल्या मार्गदर्शनात म्हटलं आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

अधिक वाचा : कोरोना : लॉकडाऊनमध्ये काय बंद आणि काय सुरू

‘कोरोना’ विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत एक जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक कर्तव्य बजावण्याचं काम संघ स्वयंसेवकांनी सुरू केलं आहे. केन्द्र सरकारच्या लॉकडाउन सारख्या उपाययोजनांमधील नियमांचे पालन करून आणि प्रशासनाच्या सल्ल्यानुसार परवानगी घेऊन आवश्यक ठिकाणी सहकार्य केले आहे, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.  

अधिक वाचा : देश लॉकडाऊनची किंमत ९ लाख कोटी!

डॉ. भागवत म्हणाले की, 'कोरोनाचं संकट मोठं आहे, यात वाद नाही. मात्र, समाजाच्या सामूहिक जबाबदारीतून या संकटावर यशस्वीरित्या मात करता येऊ शकते. औषधी, आणि आरोग्याच्या इतर सोयीसुविधा या कोरोनावर मात करण्यासाठी सहाय्यक आहेत. मात्र, या विषाणू युद्धात लढताना पहिली आणि महत्त्वाची गरज आहे ती संसर्ग टाळण्याची. 'सोशल डिस्टन्सिंग' हीच या लढाईतील प्रमुख बाब आहे. ती समाजानं पाळावी,' असं भागवत म्हणाले. समाजानंही सरकारच्या सूचनांचं पालन करून 'कोरोना'वर विजय मिळवण्याचा संकल्प करावा,' असं आवाहनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं आहे. लॉकडाऊन आणि सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन करून संघाचं कार्य सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी स्वयंसेवकांना दिल्या.

अधिक वाचा : गब्बरने मांडले लॉकडाऊनचे दुखडे, डेव्हिड वॉर्नरची प्रतिक्रिया