'कोळसा खाणींचा योग्य उपयोग केल्यास वीजनिर्मितीची गरज संपूर्ण भागेल'

Last Updated: Jun 07 2020 10:04AM
Responsive image
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


नागपूर : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण जगात कोळसा खाणींमध्ये आपल्या देशाचा चौथा क्रमांक लागतो. मात्र तरीदेखील आपणास कोळशाची बाहेरून आयात करावी लागते. कोळशाचे वीजनिर्मितीतील महत्व अनन्यसाधारण आहे. आपण दर्जेदार कोळशाची उत्पादन क्षमता संपूर्णपणे उपयोगात आणली, तर वीजनिर्मितीचा प्रश्नही मिटेल आणि संपूर्ण ग्रामीण भागाला परवडणाऱ्या दरात अखंडीत वीज पुरवठा करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. वेस्टर्न कोलफिल्डच्या वतीने नागपूरजवळील आदासा याठिकाणी एक आणि मध्यप्रदेशातील दोन कोळसा खाणींचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्या यांनी इलेक्ट्रॉनिक कळ दाबून ऑनलाईन पद्धतीने या खाणीच्या कामाचा शुभारंभ केला. 

अकोल्यात ३० नवे पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या ७५६ 

याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री  प्रल्हाद जोशी यांनीही आपले विचार मांडले. यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, खा. डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाणे, आ. ॲड. आशिष जैयस्वाल, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, डब्ल्यूसीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजू रंजन मिश्रा व इतर लोकप्रतिनिधींसह वेस्टर्न कोलफिल्डचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी आदासा खाणीत ३३४ कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार असून १.५ दशलक्ष टन कोळसा उत्पादन होणार आहे. तर ५५० जणांना रोजगार मिळणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना देण्यात आली. 

अकोल्यात बाधितांचा आकडा ७४६ वर

ग्रामीण भागात अखंडीत वीज पुरवठा हवा

यावेळी, गेल्या दोन तीन महिन्यांपासून आपण सगळे कोरोनाशी लढतोय. आपले जीवनच जणू थांबले आहे की काय असे वाटत असतांना प्रचंड उर्जेचा स्त्रोत देणाऱ्या या कोळसा खाणीचा शुभारंभ आज आपण करतोय यातून खूप चांगला संदेश आपण देत आहात असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले. तसेच अन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक वस्तूंमध्ये आपल्याला उर्जेचाही समावेश करावा लागेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज स्वातंत्र्याला इतकी वर्षे झाली पण आपल्याला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या वीजेविषयीच्या मागण्या आणि अपेक्षा शंभर टक्के पूर्ण झाल्या असे म्हणता येत नाही. अजूनही भारनियमन पूर्णपणे बंद करणे, परवडणाऱ्या दरात, अखंडीत वीज पुरवठा देणे या गोष्टींची पूर्तता आपल्याला करायची आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. चांगल्या दर्जाच्या कोळशाचे उत्पादन झाले तर वीज निर्मितीच्या अडचणी भविष्यात दूर होतील असेही ते म्हणाले. 

प्रदूषण कमी व्हावे, खाणी पर्यावरणपूरक असाव्यात

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी, कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय असल्याचे म्हणताना, कोळसा खाणींमधून निघणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रदूषित होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचतो, श्वसन व इतर आजार उद्भवतात. कोळशातील राखेचे प्रमाण कमी करण्यासाठी कोळसा धुण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे झाल्यास हे  प्रदूषणाचे प्रमाण खूप कमी होऊ शकते. त्यासाठी वॉशरीज चांगल्या हव्यात. कोळशाच्या खाणी जेव्हा उत्पादन पूर्ण झाल्यावर बंद केल्या जातात, तेव्हा त्या तशाच न सोडता त्यावर झाडे फुलवून, त्या जागेवर जंगल तयार केल्यास पर्यावरणाला मदत होईल असे स्पष्ट केले. तसेच कोळसा खाणी बंद करण्याचा कालावधी पण निश्चित केला पाहिजे असेही ते म्हणाले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागपूर-नागभीड ब्रॉडगेज मार्गाचा प्रारंभही लवकरच करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती तयारी राज्य सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

राज्यात १४ खाणी सुरू होणार

येणाऱ्या ४ वर्षांत राज्यात १४ खाणी सुरू होत आहेत आणि त्यातील ३ याच वर्षी सुरू करण्याचे आपण ठरविले आहे. या खाणींमुळे ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक होईल आणि सुमारे १३ हजार लोकांना रोजगार मिळेल अशी माहिती यावेळी वेस्टर्न कोलफिल्डने दिली.

विदर्भाचा विकासास हातभार लागेल : गडकरी

कोळसा खाणीच्या निर्मितीमुळे विदर्भाचा विकास होण्यास हातभार लागेल तसेच रोजगारात वाढ होईल. विद्युत यंत्रांमुळे कोळशांची उपलब्धता निश्चितच वाढेल. कोळशाची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यात नवीन तंत्रज्ञानावर भर द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

कोल इंडियाकडून २० कोटी रुपये देण्याची घोषणा

यावेळी कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कोल इंडियाकडून २० कोटी रुपये देण्याची घोषणा कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केली. यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.