Fri, Sep 21, 2018 11:26



होमपेज › Vidarbha › सत्तापरिवर्तनाच्या तयारीला लागा 

सत्तापरिवर्तनाच्या तयारीला लागा 

Published On: Dec 12 2017 8:19PM | Last Updated: Dec 12 2017 8:19PM

बुकमार्क करा





नागपूर : चंदन शिरवाळे

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला भाजप सरकारकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करीत सत्तांतरानंतर तीन वर्षांनी एकत्र आलेल्या विरोधी पक्षांनी केंद्र व राज्य सरकारवर विविध आरोप केले. सर्वसामान्य जनता, शेतकरी व कष्टकरीविरोधी हे सरकार असल्याचे सांगत जनतेने २०१९ मध्ये होणाऱ्या सत्तांतराच्या तयारीला लागवे, असे आवाहन विरोधी पक्षांनी संयुक्तपणे केले.

नागपुरात मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चात विरोधी पक्षांच्या सर्वच नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बळीराजाला संकटातून बाहेर  काढण्यासाठी सरकारवर  हल्लाबोल करावा लागत असल्याबाबत खंत व्यक्त केली. ते म्हणाले,  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने झोपेचे सोंग घेतले असल्यामुळे आता सरकारला मुळापासून उपटून टाकण्याची वेळ आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सरकार  शेतकऱ्यांना केवळ थापा मारण्याचे काम करीत आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर दीड हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तरीही सरकारला पाझर फुटला नाही. त्यामुळे सरकारच काही देत नाही तर, तुम्हीसुद्धा सरकारला सोसायटीचे कर्ज, पाणी आणि वीज बिल देऊ नका, असे आवाहन पवार यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल पदयात्रावर टीका केली होती. हल्लाबोल करणाऱ्यांनी गेल्या पंधरा वर्षात सत्तेत असताना कुठे-कुठे डल्ला मारला याची आपल्याकडे माहिती आहे, तिचा आपण लवकरच सभागृहात भांडाफोड करू, असा इशारा दिला होता. तो संदर्भ पकडून पवार यांनी, दमदाटी करून राज्य चालत नाही. तुम्ही जर असेच वागाल तर तुम्हालाही उखडून टाकायची ताकत बळीराजामध्ये आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला.

काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबतच्या  बैठकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिकेचाही पवार यांनी समाचार घेतला.

काँग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकच विचारधारा असल्याचे सांगितले. ते म्हणाले,  देशाच्या प्रगतीसाठी आम्ही लढत आहोत तर  खोटे बोलून  सत्ता मिळविलेल्या भाजपकडून शेतकरी व जनतेच्या हिताची कामे केली जात नसल्यामुळे हल्लाबोल आणि जनआक्रोश करावा लागत आहे. खोटी आश्वासने देत सरकार दिवस काढत आहे. भाजपच्या वार्ड किंवा जिल्हा अध्यक्षांनी खोटी आश्वासने दिली असती तर आम्ही विसरलो असतो, पण पंतप्रधान पदावरील व्यक्ती खोटं बोलत आहे, असा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन देशाचा अपमान केला आहे. नोटबंदीमध्ये शेकडो लोकांना हकनाक बळी जावे लागले. त्यामुळे हा जनआक्रोश केवळ निवडणुकी पुरता मर्यादित न राहता जनकल्याण साधण्यासाठी झाला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी राज्य सरकारच्या मी लाभार्थी या जाहिरातबाजीची खिल्ली उडविली. ते म्हणाले, जाहिरातबाजीवर सरकारने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला परंतू शेतकऱ्यांची अजूनही कर्जमाफी केली नाही.आपला हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा लावणारे हे सरकार आता बदला, असे आवाहन विखे यांनी केले.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तीन वर्षात राज्यात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून कर्जमाफीचा निर्णय होऊनही दीड हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याला मुख्यमंत्री  जबाबदार असल्याचा आरोप केला.

ज्या महाराष्ट्राने भाजपला तीन वर्षांपूर्वी डोक्यावर घेतले, तीच जनता या पक्षाच्या सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देऊ नका, असे आवाहन केले. स्टॅम्प पेपरवर लिहून देणाऱ्यांना अजून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली नाही, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला. आता स्वस्त बसून चालणार नाही. कल्याणकारी राज्य आणण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे तटकरे म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी समाजातील सर्व घटकात सरकारच्या धोरणांमुळे असंतोष निर्माण झाला असल्याचे सांगितले. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. शरद पवार  आणि राहुल गांधी या दिग्गज नेत्यांच्या जोरावर आपण २०१९ ला सत्तेवर येणार आहोत. हे न्याय देणारे सरकार नाही. समाजातील प्रत्येक घटकावर हे सरकार दबाव टाकत असून सर्वत्र अघोषित आणीबाणी लादली आहे. त्यामुळे यावर मात करायची असेल तर परिवर्तन केलेच पाहिजे, अशी भावना चव्हाण यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. ते म्हणाले, ही लढाई शेतकऱ्यांची पांढरी टोपीविरुद्ध काळी टोपी यामध्ये सुरू आहे. देशात धार्मिक तेढ वाढवण्याचे काम नागपूरमधून होत आहे. त्यामुळे देशात न्यायाचे सरकार आणले पाहिजे. ही केवळ आजची लढाई नाही तर भावी पीढीच्या भवितव्यासाठी आपल्यालाला लढावे लागणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी जनआक्रोश मोर्चाला मिळालेला प्रतिसाद व दोन्ही काँग्रेसची ताकद बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडाली असेल, अशा शब्दात टीका केली.

यावेळी हल्लाबोल पदयात्रा यशस्वी केल्याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.