Sun, May 26, 2019 20:39होमपेज › Vidarbha › राजकीय अफवांना सभागृहात चोख उत्तर

राजकीय अफवांना सभागृहात चोख उत्तर

Published On: Jul 04 2018 2:23AM | Last Updated: Jul 04 2018 1:36AMनागपूर : दिलीप सपाटे 

विरोधक सरकारविरोधात अफवा पसरवित असून या राजकीय अफवांना सभागृहात वस्तुस्थितीचे चोख उत्तर उत्तर देऊ, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाचे आव्हान स्वीकारले. नवी मुंबईतील भूखंड विक्री प्रकरणात काहीही चुकीचे घडलेले नाही. भतीजा बिल्डरवरून विरोधक आरोप करीत आहेत. मागील सरकारमध्ये या भतीजाचे चाचा कोण होते , ते आपण सभागृहात दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. 

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यानी आपल्या रामगिरी निवासस्थानी चहापान आयोजित केले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्याचे धोरण 30 वर्षांपूर्वीचे आहे. जमीन वितरणाचे अधिकार हे जिल्हाधिकार्‍यांना आहेत. ज्या भूखंडाची विक्री झाली तो सिडकोचा नाही तर सरकारचा आहे. त्याची रेडीरेकनरच्या दरानुसार 5 कोटी 30 लाख रुपये किंमत होते. याआधी काँग्रेस - राष्ट्रवादीआघाडी सरकारच्या काळात 200 पेक्षा जास्त सात-बाराचे वाटप अशाच पद्धतीने झाले आहे. मात्र, याप्रकरणी विरोधकांना हवी ती चौकशी करण्यास आपण तयार आहोत. आघाडी सरकारमध्ये बिल्डर भतीजा याचे चाचा कोण होते, याचीही माहिती सरकारकडून सभागृहात दिली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधी पक्षाने सरकारवर अफवाबाजीचा आरोप केला होता. या टीकेचा समाचार घेताना मुख्यमंत्र्यानी विरोधकांना चर्चेला सामोरे येण्याचे आव्हान दिले. सरकार नव्हे विरोधी पक्षच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अफवा पसरविण्याचे काम करत आहे. त्यांच्या राजकीय अफवांना आम्ही राजकीय उत्तर देऊ,असे फडणवीस म्हणाले. 

अफवा पसरविणार्‍या कडक कारवाई

धुळ्यात घडलेल्या हत्त्याकांडाच्या घटनेचा संदर्भ घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता राज्यात अफवा पसरविणार्‍या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. लोकांनी खात्री करूनच आलेला संदेश पुढे पाठवावा. अफवा पासरविणारा संदेश पुढे फॉरवर्ड कारणे हा देखील गुन्हा आहे. तेव्हा कात्री करूनच मेसेज पाठवा. संशय असेल तर पोलिसांना कळवा असे आवाहनही त्यांनी केले. 

तूर खरेदीत बाजार समित्यांकडून घोटाळा 

राज्य सरकारने ज्यांची तूर खरेदी झाली नाही त्यांना प्रति क्विंटल 1 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यात बाजार समित्या घोटाळा करीत असल्याचे लक्षात आले आहे. खरेदीचा संगणकातील नोंदी बदलल्या गेल्याचे सामोरे आले आहे. अशा पाच हजार केसेस आढळून आल्या आहेत. या खरेदीत अनियमितता करणार्‍या बाजार समित्यांवर गुन्हे दाखल करणार असे मुख्यमंत्री म्हणाले.

दूध उत्पादकांसाठी आधिवेशनात धोरण 

दुधाचे कोसळलेले दर पाहता दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी याच आधिवेशनात धोरण आणण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. राज्य सरकारने दर वाढविण्यासाठी दूध भुकटी निर्यातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वी घेतला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. सरकारने अन्य राज्यातील योजनांची माहिती मागितली आहे. चालू अधिवेशनात दूध उत्पादकांना दिलासा दिला जाईल , असे मुख्यमंत्री म्हणाले.