होमपेज › Vidarbha › गोळीबारात पोलिस शिपाई गंभीर जखमी

गोळीबारात पोलिस शिपाई गंभीर जखमी

Published On: Aug 19 2018 6:28PM | Last Updated: Aug 19 2018 6:28PMनागपूर : प्रतिनिधी

अज्ञाताने केलेल्या गोळीबारात पोलिस शिपाई गंभीर जखमी झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यात अहेरी-आलापल्ली मार्गावरील हसनबाग हॉटेलनजीक घडली. सुखदेव दशरथ कावळे असे जखमी शिपायाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, काल मध्यरात्री अज्ञात इसमांनी घराच्या खिडकीतून आत प्रवेश करुन सुखदेव कावळे यांच्यावर गोळीबार केला. यावेळी सुखदेव यांच्या पत्नीने आरडाओरड केला. शेजार्‍यांनी घटनास्थळी धाव घेताच गोळीबार करणाऱ्यांनी पळ काढला. 

शेजाऱ्यांनी रक्तबंबाळ झालेल्या सुखदेव यांना अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना चंद्रपूरला हलविण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला नेण्यात आल्याची माहिती आहे. सुखदेव कावळे हे सिरोंचा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. एका प्रकरणात निलंबित झाल्याने कोरची तालुक्यातील कोटगूल पोलिस मदत केंद्रात त्यांची बदली करण्यात आली होती, अशी माहिती आहे. मात्र, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी कावळे यांच्यावर कशासाठी हल्ला केला, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.