Sun, Nov 17, 2019 12:22होमपेज › Vidarbha › १५ खासदारांविरोधात हायकोर्टात याचिका

१५ खासदारांविरोधात हायकोर्टात याचिका

Published On: Jul 10 2019 1:44AM | Last Updated: Jul 10 2019 1:44AM
औरंगाबाद / नागपूर : प्रतिनिधी 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नंदुरबार, बीड, नांदेड, परभणी, लातूरसह विदर्भ आणि नंदूरबार येथील 15 मतदारसंघांतून निवडून आलेल्या खासदारांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद  आणि नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

विदर्भातील सात पराभूत उमेदवारांनी निवडून आलेल्या खासदारांच्या निवडणुकीला नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या खासदारांमध्ये भाजपचे नितीन गडकरी, अशोक नेते, सुनील मेंढे, रामदास तडस, शिवसेनेचे कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव आणि काँग्रेसचे बाळू धानोरकर यांचा समावेश आहे. या याचिकांवर लवकरच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे.  
निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात खोटी, चुकीची व दिशाभूल करणारी माहिती नमूद केल्या प्रकरणात बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे. या निवडणुकीतील पराभूत उमेदवार कालिदास आपेट यांनी अ‍ॅड. अजित काळे यांच्यामार्फत ही याचिका सादर केली आहे. निवडणूक आयोगाच्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 125-अ नुसार खोटी माहिती सादर करणे हा गुन्हा असून, त्यांतर्गत ही याचिका सादर करण्यात आली. दोन मतदारयाद्यांत नाव असणे, आर्थिक व्यवहार लपवून ठेवणे, भावनिक मुद्द्याच्या आधारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी वडील गोपीनाथ मुंडे यांचे नाव लावणे, वैद्यनाथ अर्बन को-ऑप. बँकेच्या त्या संचालक असून, त्यांच्याविरोधात बोगस कर्जवाटप केल्याप्रकरणी परळी फसवणुकीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल आहे. त्याचीही माहिती मुंडे यांनी सादर केलेली नाही, असे आक्षेप याचिकेत घेण्यात आले आहेत.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून विजयी डॉ. हिना गावित यांच्याविरोधात शंकर वसावे यांनी अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर बागुल यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी ज्या बाँड पेपरवर शपथपत्र सादर केले तो बनावट आहे, त्यांनी शपथपत्र पूर्ण भरले नसून, अनेक जागा रिकाम्या सोडल्या आहेत, आपल्यावर अवलंबित्वाची नावे चुकीची दिली असून, यात वडील माजी मंत्री विजयकुमार गावित आणि आई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा होत्या, हे दाखवून देण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या उत्पन्‍नाचे सर्व स्रोत उघड केलेले नाहीत, त्यांनी प्रचारात फेसबुक आणि ट्विटरचा उपयोग केला; परंतु त्याची माहिती उघड केली नाही, त्यांनी निवडणूक खर्च लपविला आदी आक्षेप घेण्यात आले आहेत.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार खा. इम्तियाज जलील यांच्याविरोधात पराभूत उमेदवार शेख नदीम यांनी अ‍ॅड. सिद्धेश्‍वर ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली असून, यात दोन समाजांत धार्मिक तेढ निर्माण करणे, धर्माच्या आधारे मतदानाचे आवाहन करणे, खर्च लपविणे आदी आक्षेप घेण्यात आले आहेत. 

या आणि अशाच कारणांवरून डॉ. प्रीतम मुंडे यांच्याविरोधात विष्णू तुळशीराम जाधव यांनी याचिका दाखल केली आहे. याशिवाय उस्मानाबाद मतदारसंघातील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात मनोहर अनंतराव पाटील, जालना लोकसभा मतदारसंघातील खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात डॉ. शरदचंद्र वानखेडे, नांदेड येथील खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांच्याविरोधात यशपाल भिंगे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात मोहन फत्तुसिंग राठोड, परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याविरोधात आलमगीर खान आणि लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्याविरोधात रामराव गारकर यांनी निवडणूक याचिका सादर केल्या आहेत. 

सदोष ईव्हीएमच्या वापराची तक्रार

याशिवाय काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी तुमाने यांच्या निवडणुकीला, तर वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे, कारू नान्हे, बळीराम सिरसकर, अ‍ॅड. राजेंद्र महाडोले आणि धनराज वंजारी यांनी इतर खासदारांच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. निवडणुकीत सदोष ईव्हीएम वापरण्यात आले. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान, यात फरक आढळून आला. त्याचा फायदा विजयी उमेेदवारांना मिळाला. तसेच  निवडणूक अधिकार्‍यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. काही याचिकाकर्त्यांतर्फे फिरदोस मिर्झा व निहालसिंग राठोड, तर निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. नीरजा चौबे कामकाज पाहत आहेत. 

गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले यांची याचिका

गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर ऊर्फ सागर डबरासे यांच्यासह एकूण तिघांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे.