Sun, Sep 22, 2019 21:51



होमपेज › Vidarbha › राज्यातील धरणांमध्ये फक्‍त 7 टक्के पाणी साठा

राज्यातील धरणांमध्ये फक्‍त 7 टक्के पाणी साठा

Published On: Jun 05 2019 1:32AM | Last Updated: Jun 04 2019 10:35PM




नागपूर ः प्रतिनिधी

उन्हाचा तडाखा कायम असल्याने राज्यातील धरणांनी तळ गाठला आहे. राज्यात फक्‍त 7 टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यामुळे चिंता वाढली आहे. 

सिंचन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार औरंगाबाद विभागात एक टक्क्यापेक्षाही कमी, तर नागपूर विभागात सहा टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणी साठा शून्य टक्क्यावर आला आहे. चांगला पाऊस पडला तरच या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होईल.  

विदर्भातील गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प देशातला दुसरा सर्वात मोठा प्रकल्प आहे; पण सध्या या धरणात उपयुक्‍त पाणी साठा शून्य टक्के आहे. विदर्भातल्या एकूण 372 सिंचन प्रकल्पांमध्ये फक्‍त सहा टक्केच पाणी उपलब्ध आहे. राज्य सरकारने नागपूर शहराची तहान भागवण्यासाठी आता पेंच आणि कन्हान प्रकल्पाच्या मृत साठ्यातील पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. 

उन्हाळ्यात सिंचन प्रकल्पासंदर्भात हवे तसे नियोजन राज्य सरकारने केल्याचे दिसत नाही. एकीकडे धरणे कोरडी पडत असताना धरणांतला गाळ काढून पाणीसाठा भविष्यासाठी वाढवता आला असता; पण यासंदर्भातही काहीही काम झाले नाही, असे सिंचन अभ्यासक प्रवीण महाजन यांचे म्हणणे आहे.

सरकारच्या या कारभारानुसार आता मान्सूनपर्यंत वाट पाहण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. त्यातच मान्सून वेळेवर आला नाही किंवा चांगला बरसला नाही, तर ही स्थिती आणखी विदारक होण्याची चिन्हे आहेत.