Wed, Apr 01, 2020 07:55होमपेज › Vidarbha › अमरावती : विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या प्राचार्यांसह ३ प्राध्यापक निलंबित 

अमरावती : विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या प्राचार्यांसह ३ प्राध्यापक निलंबित 

Last Updated: Mar 01 2020 1:01AM

अमरावती : विद्यार्धिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देताना प्राध्यापक.अमरावती : विशेष प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील शालेय विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणार्‍या तीन प्राध्यापकांना संस्थेने चौकशी पुर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे. चांदुर रेल्वे येथील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यासह तीन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली. 

या तिघांना दहा दिवसांपुर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी समितीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. शपथ प्रकरणी एक सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, या तीनही प्राध्यापकांचे निलंबन मागे घेण्यात यावे याकरीता विद्यार्थिनींनी महाविद्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. आमच्या आई वडिलांप्रमाणे या तीन प्राध्यापकांनी आमच्या काळजीपोटी आम्हाला अशी शपथ दिली, त्यामुळे त्यांचं निलंबन रद्द करावे अशी मागणी विद्यार्थीनींनी केली आहे.

निलंबनाची ही कारवाई नियमानुसार करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी म्हंटले आहे. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर प्राध्यापकांच्या निलंबनाबाबत निर्णय घेण्यात येईल असेही धांडे यांनी सांगितले. या प्रकरणानंतर राज्यभर तिव्रतेने प्रतिक्रिया उमटल्या नंतर संबधीत प्राध्यापक आणि प्राचार्यांनी माफिनामा सादर करीत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेत, संबधीतांवर कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 

'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी प्रेम न करण्याची शपथ आणि त्यानंतर माफीनामा प्रकाराबाबत प्राचार्य आणि इतर दोन प्राध्यापकांना ही कारणे दाखवा नोटीस बजावली होती. असंवैधानिक कृत्यांना संस्थेत थारा नाही. त्यामुळे नियमानुसार कारवाई केली जाईल, असे विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी या पुर्वीच जाहीर केले होते. चांदूर रेल्वे तालुक्यातील टेंभुर्णी येथे महिला कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात १३ फेब्रुवारीला प्राध्यापकांनी प्रेमविवाह न करण्याची शपथ दिली होती. 

विद्यार्थिनींना शपथ दिल्‍या प्रकरणी राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. विद्यार्थिनींना देण्यात आलेली शपथ ही कायदेसंगत नाही. तशी असंवैधानिक शपथ देताना संस्थेची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. घडल्या प्रकाराबाबत संस्थेला पूर्णत: अनभिज्ञ ठेवण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम पत्रिकेत या कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे आपण केलेले कृत्य असंवैधानिक आणि संस्थेची प्रतिमा मलिन करणारे आहे, त्यासाठी आपणाविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये? अशा आशयाचा मजकूर कारणे दाखवा नोटिसीमध्ये बजावण्यात आला होता. त्यानंतर आता एकसदस्यीय चौकशी समिती नेमून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.