Tue, Apr 23, 2019 07:34होमपेज › Vidarbha › जनता आनंदी करण्यासाठी नवे ‘आनंद’ मंत्रालय

जनता आनंदी करण्यासाठी नवे ‘आनंद’ मंत्रालय

Published On: Jul 12 2018 8:28AM | Last Updated: Jul 12 2018 8:28AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

आनंदी माणसांच्या निकषांत देश 113 व्या क्रमांकावर असून ही परिस्थिती बदलण्यासाठी व राज्यातील जनतेला आनंदी ठेवण्यासाठी राज्य सरकारने आनंद मंत्रालय (हॅपिनेस मिनिस्ट्री) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंत्रालयाचा आराखडा तयार झाला असून लवकरच त्याबाबतचा प्रस्ताव अधिवेशनानंतर मांडण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

समाधानी आणि आनंदी लोकांच्या देशाच्या क्रमवारीत जगात भूतान पहिल्या स्थानी, तर भारत 113 व्या क्रमांकावर आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सरकार विकास करीत असले, तरी यातून जनतेमध्ये आनंद नाही. काही रुग्ण असे आहेत की त्यांची शुश्रूषादेखील करण्यास कोणी मिळत नाही. तसेच धकाधकीच्या जीवनात लोक हे आनंद गमावून बसले आहे. यामुळे मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आनंद मंत्रालय करण्यात स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. 

या मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी व अन्य वर्गातील लोकांसाठी सहली आयोजित करणे, उद्यानांची निर्मिती करणे, धार्मिक सहलीचे आयोजन करणे, मनोरंजन पार्क, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे आदी उपक्रम सुरू केले जाणार आहेत. हे मंत्रालय सध्या मदत व पुनर्वसन खात्याअंतर्गत राहणार आहे.