Mon, Mar 25, 2019 02:50
    ब्रेकिंग    होमपेज › Vidarbha › पप्पा,मम्मीच्या डोक्यावर लोखंडी पाईपने मारले; स्वातीची साक्ष

‘त्यांनी पप्पा,मम्मीच्या डोक्यावर लोखंडी पाईपने मारले’

Published On: Dec 09 2017 2:19AM | Last Updated: Dec 09 2017 1:25PM

बुकमार्क करा

नागपूर ः प्रतिनिधी

ट्रॅक्टरचा धक्का बांबूला लागल्याने तो तुटला पप्पा त्यांना समजविण्यासाठी गेले. मात्र, त्यांनी भांडण करीत पप्पा आणि मम्मीचे पाय ओढत त्यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने मारले. ते माझ्या मागेही धावले. मी घाबरुन घरात घुसले. ते मम्मी-पप्पांना मारतच होते हा आर्त स्वर आहे, चिमुकल्या स्वातीचा.  अमरावती जिल्ह्यातील गोविंदपूर येथे बुधवारी रात्री हल्ल्यात मृत पावलेल्या लिल्लारे दाम्पत्याची ही चिमुकली. तिने गुरुवारी हजारोंच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या अंतिम संस्कार प्रसंगी माध्यमांना ही माहिती दिली. तसेच यावेळी तिने मला माझे मम्मी-पप्पा हवे असा फोडलेला हंबरडा सर्वांना हेलावून गेला.

चांदुरबाजार तालुक्यातील गोविंदपूर हे जवळपास दीड हजार लोकवस्तीचे खेडे. शिरजगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या गोविंदपुरात बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास कैलास उत्तमराव लिल्लारे व त्यांची पत्नी गीता यांची त्यांचेच काका रतन, मदन व जगन प्रेमलाल लिल्लारे यांनी अतिशय क्षुल्लक कारणावरून त्यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने प्रहार करून हत्या केली. 

शिरजगाव पोलिसांनी फिर्यादी अंकुश सोपान रणगिरे यांच्या तक्रारीवरून भादंविच्या 302,34 अन्वये आरोपींना तत्काळ अटक केली.  आरोपी हे मृत लिल्लारे दाम्पत्यांचे चुलत काका आहेत. दोघांची घरे आजुबाजूला. दोघांच्या घरांचे बांधकाम सुरू आहे. सायंकाळी मुरुम आणणार्‍या ट्रॅक्टरचा धक्का लागून कुंपणाचा वेळू तुटला.पण, त्यावरून पुढे दाम्पत्याचे मुडदे पाडले गेले. गोविंदपूर नजिकच्या हिंदू स्मशान भूमीत नि:शब्द वातावरणात हजारोंच्या उपस्थितीत लिल्लारे दाम्पत्यावर गुरुवारी सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. 

चांदूरबाजार न्यायालयाने तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींनी हत्येसाठी वापरलेले लोखंडी पाईप, रक्ताने माखलेले कपडे, इतर साहित्य जप्त करण्यात येईल, अशी माहिती ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी दिली. या कौटुंबिक वादात चिमुकली स्वाती मात्र निराधार झाली आहे.