Sun, Jul 21, 2019 08:26होमपेज › Vidarbha › सरकार आणि विरोधकांनी विधानसभेचा केला आखाडा(व्हिडिओ)

सरकार आणि विरोधकांनी विधानसभेचा केला आखाडा(व्हिडिओ)

Published On: Dec 11 2017 5:17PM | Last Updated: Dec 11 2017 5:19PM

बुकमार्क करा

नागपूर : चंदन शिरवाळे

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत सरकार आणि विरोधकामध्ये वार - पलटवार झाले. कोणी किती कर्जमाफी दिली हे सांगण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याने सभागृहाचा  आखाडा झाला होता.

आतापर्यंत खरोखरच 41 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असल्यास सरकारने शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून द्यावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभरच काय 1 हजार रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून देण्याची सरकारची तयारी असल्याचे प्रतिआव्हान दिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे काँग्रेस आघाडी सरकारचे पाप आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर पलटवारही केला.

सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात होताच विखे- पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कर्जमाफी विषयावर बोलण्यासाठी स्थगन प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी विखे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली होती. पण ती  अमान्य केली. मात्र शेतकरी कर्जमाफी महत्वाची असल्यामुळे आपणास बोलण्यास देत असल्याचे बागडे यांनी स्पष्ट केले.

विखे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत सरकारने घोळ घातल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांचे नावावर बँकेत पैसे जमा झाले नाहीत. कर्जमाफी न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे.  कर्जमाफी योजनेत समावेश न झालेले वाशिम जिल्ह्यातील शेतकरी ज्ञानेश्वर नारायण मिसाळ नावाच्या शेतकऱ्याने  ६ डिसेंबर रोजी आत्महत्या केली, असे सांगत या शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातील काही मजकूर वाचून दाखवत विखे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारसमोर मांडल्या. 

आता शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी करत त्यांनी कापसावरील बोंडअळी, धानावरील तुडतुडा,सोयाबीन खरेदीत झालेली शेतकऱ्यांची लूट आदी मुद्यांवरून सरकारवर  हल्ला चढवला. सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, कापसाला २५ हजार रूपये एकरी तर धानाला १० हजार रूपये एकरी भरपाई द्यावी, सोयाबीनला प्रति क्विंटल ५०० रूपये मदत जाहीर करावी, अशी मागणीही विखे यांनी केली.

यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले. आघाडी सरकारच्या कार्यकाळापासून शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. कर्जबाजारी शेतकरी हे तुमचेच पाप आहे.याला तुम्हीच जबाबदार आहात.

तुम्ही केंद्राकडून आणलेली जेवढी कर्जमाफी संपूर्ण विदर्भाला दिली, त्याहून जास्त आम्ही एकट्या बुलढाणा जिल्ह्याला दिली आहे, अशा शब्दत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला.

विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे. विरोधकांचे अश्रू हे मागरीचे अश्रू आहेत. आम्ही 41 लाख शेतकर्यांना कर्ज माफी दिली आहे. यात 6 लाख ओटीएस , 21 लाख थेट तर उर्वरित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर  कर्जमाफी देत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

कापसाच्या आणि धानाच्या शेतकऱ्यांनाही मदत देण्यात येईल . इतकेच नाहींतर शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच ठेवू, असेही त्यांनी विरोधकांना  ठणकावून सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. गोंधळातच सत्ताधाऱ्यांनी कामकाज रेटले. विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्ताव पुकारल्याने त्यांना आपला राग आवरता घ्यावा लागला.

गिरीष बापट यांच्याकडून विरोधकांचा ऐकेरी उल्लेख

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उत्तरावर विखे पुन्हा बोलायला उभे राहिले, पण विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी त्यांना परवानगी नाकारली. यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. विरोधक खाली बसत नसल्यामुळे कामकाज थांबल्याचे पाहून संसदीय कामकाज मंत्री बापट उभे राहिले आणि त्यांनी विरोधकांच्या दिशेने हातवारे करीत ए तू खाली बस, तू झाली बस अशा शब्दात सदस्यांचा अवमान केला. पण गोंधळामुळे हे शब्द विरोधकांना ऐकता आले नाहीत.