Wed, May 22, 2019 20:18होमपेज › Vidarbha › प्रा. शोमा सेनवर नागपूर विद्यापीठाची निलंबनाची कारवाई

प्रा. शोमा सेनवर नागपूर विद्यापीठाची निलंबनाची कारवाई

Published On: Jun 16 2018 12:25PM | Last Updated: Jun 16 2018 12:25PMनागपूर : प्रतिनिधी 

पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या नागपूर विद्यापीठातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. शोमा सेन यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने निलंबित केले आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांनी दिली.  

 भीमा-कोरेगाव येथे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारापूर्वी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे यांच्यासह अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन यांना 6 जून रोजी अटक करण्यात आली होती.

दोन महिन्यांपूर्वी या सर्वांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकले होते. तेथून काही पुस्तके आणि भित्तिपत्रके जप्त करण्यात आली होती. या दस्तावेजातून अ‍ॅड. गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचे उघड झाले होते.

6 जून रोजी अटक करताना पोलिसांनी शोमा सेन यांच्या घरातून संगणकाची हार्डडिस्क आणि इतर माओवादी साहित्य जप्त केले होते. त्यावरून प्रा.सेन यांचे नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही लोक या प्रकरणात गुंतले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान नागपूर विद्यापीठाने प्रा. सेन यांना निलंबित करून कारवाईचे पाऊल उचलले आहे.

पती तुषारकांती भट्टाचार्य पूर्वाश्रमीचे जहाल नक्षलवादी

शोमा सेन या पूर्वीपासून माओवादी विचारांशी जुळल्या असून त्यांचे पती तुषारकांती भट्टाचार्य हे पूर्वीचे जहाल नक्षलवादी आहेत. शोमा सेन यांच्या अटकेनंतर कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांनी कायदेतज्ज्ञांचे मत मागवले होते. कोणत्याही शासकीय किंवा निम्नशासकीय व्यवस्थेत नोकरीला असलेल्या व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्याखाली अटक झाल्यावर 48 तासांच्या आत सुटका झाली नाही तर अशा व्यक्तीला 48 तास उलटून जाताच तत्काळ निलंबित करणे आवश्यक असते. याच निकषाच्या आधारे विद्यापीठाने आता शोमा सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.