होमपेज › Vidarbha › नागपुर : महिलेच्या पोटात 15 वर्षांपासून ‘स्टोन बेबी’

वाटली ॲसिडिटी, पण होते १५ वर्षांचे अर्भक !

Published On: Dec 01 2017 10:45AM | Last Updated: Dec 01 2017 10:45AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी
मनुष्याने विकासाचे कितीही दावे केले तरी निसर्ग कधी काय धक्का देईल, याचा अंदाज बांधता येणे अशक्य आहे. वैद्यकीय जगताला अचंबित करणारे असेच एक प्रकरण नागपूर शहरात पहायला मिळाले आहे. एका महिलेच्या शरीरात 9 महिने नव्हे तर तब्बल 15 वर्षे भ्रूण होता. आश्‍चर्याची बाब म्हणजे हा भ्रूण गर्भाशयात नव्हे तर पोटात होता. इतकी वर्षे शरीरात राहिल्याने भ्रूणाचे शरीर टणक झाले होते.

वैद्यकीय परिभाषेत याला ‘स्टोन बेबी’ असे संबोधण्यात येते. शहरातील ‘लॅप्रोस्कोपिक सर्जन’ डॉ. नीलेश जुननकर यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित महिलेला 15 वर्षांच्या यातनेपासून मुक्तता मिळाली. जयश्री तायडे यांना गेल्या 15 वर्षांपासून पोटदुखीची समस्या होती. ‘अ‍ॅसिडिटी’मुळे असे होत असेल असे त्यांना वाटायचे. मात्र काही दिवसांपासून त्रास जास्त वाढला होता व उलट्या होऊ लागल्या होत्या.

अखेर त्या डॉ. नीलेश जुननकर यांच्याकडे तपासणीसाठी गेल्या. डॉ. जुननकर यांनी रुग्णाचे सिटी स्कॅन केले असता आतड्यांमध्ये ‘स्टोन’सदृश गोष्टीमुळे अडथळा निर्माण झाल्याने दिसून आले. यानंतर ‘लॅप्रोस्कोपी’ करण्यात आली असता डॉ. जुननकर यांनादेखील धक्का बसला. कारण ती ‘स्टोन’सदृश गोष्ट ही चक्क चार महिन्यांचा मृत भ्रूण होता. गर्भधारणेचे वय नसताना रुग्णाच्या पोटात हा गर्भ कुठून आला ही बाब आश्‍चर्यचकित करणारी होती. यानंतर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली असता या भ्रूणामुळे आतड्यांना इजा पोहोचल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी त्वरित भ्रूण आणि चार फुटांचे आतडे काढले. जयश्री तायडे यांचे 1999 साली लग्न झाले होते व 2000 मध्ये त्यांनी मुलीला जन्म दिला होता. 2002 मध्ये त्या परत गर्भवती राहिल्या, मात्र काही कारणांमुळे गर्भपात करण्यासाठी त्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या.

पूर्णपणे गर्भपात झाल्याचा त्यांचा समज झाला होता. मात्र प्रत्यक्षात तो गर्भ त्या प्रक्रियेदरम्यान पोटात स्थानांतरित झाला. ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. 4 ते 5 महिने तो गर्भ वाढला. त्यानंतर गर्भाशयासारखे पोषक वातावरण न मिळाल्यामुळे तो मृत झाला. वर्षागणिक तो भ्रूण ‘कॅल्सिफाय’ झाला व दगडासारखा टणक झाला. मात्र यामुळे आतड्यांना इजा पोहोचत गेली, असे डॉ. नीलेश जुननकर यांनी सांगितले.