Fri, Jan 18, 2019 04:41होमपेज › Vidarbha › भाजपचे नागपुरातील आमदार कुंभारेही बंडाच्या तयारीत?

भाजपचे नागपुरातील आमदारच बंडाच्या तयारीत?

Published On: Dec 30 2017 8:11AM | Last Updated: Dec 30 2017 8:11AM

बुकमार्क करा
नागपूर : प्रतिनिधी

नाना पटोलेंपाठोपाठ नागपुरातील भारतीय जनता पक्षाचे आमदार विकास कुंभारे यांनीही पुन्हा राजीनाम्याचा इशारा दिल्याने भाजपपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कुंभारे यांना तातडीने मुंबईत बोलावून घेत समजूत घालून सबुरीचा सल्ला दिला असल्याचे सांगण्यात येते.

 माजी खासदार नाना पटोले यांनी पक्षाला रामराम ठोकल्यावर काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनीही बंडाचा झेंडा उभा केला होता. आता कुंभारे यांच्याकडूनही अशा प्रकारचे इशारे दिले जात असल्याने भाजपच्या चिंता वाढल्या आहेत. मध्य नागपूर या मतदारसंघातून आमदार विकास कुंभारे निवडून येतात. हलबा समाज हा प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचा मतदार राहिला आहे. हलबा समाजाचे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन भारतीय जनता पक्षाने आधी दिले होते. मात्र, अद्यापही ते प्रश्‍न जैसे थे स्थितीत आहेत, असा दावा विकास कुंभारे यांनी केला आहे. प्रश्‍न न सुटल्यास राजीनामा देण्याचा इशारा आमदार कुंभारे यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी पक्षाला दिला. कुंभारे यांच्या इशार्‍याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान त्यांच्याशी बोलून समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आमदार कुंभारे यांनी पुन्हा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.