Mon, May 20, 2019 07:59होमपेज › Vidarbha › दत्तक मुलीसाठी त्यांनी ओलांडल्या धर्माच्या भिंती  

दत्तक मुलीसाठी त्यांनी ओलांडल्या धर्माच्या भिंती  

Published On: Feb 23 2018 8:25AM | Last Updated: Feb 23 2018 8:25AMनागपूर : प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्याच्या कामठी येथील नगरसेवक अहफाज अहमद यांनी धर्माचे धुपाटणे फेकून देत दत्तक मुलगी सुषमावर आपल्या पालकत्वाची तिळमात्रही बंधने न लादता तिच्या मूळ हिंदू धर्माप्रमाणे तिचे लग्‍न लावून दिले व वधू पित्याचे चोख कर्तव्य बजावलेे. या विवाह सोहळ्याची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा सुरू आहे. या शुभ विवाहाला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामठी विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हजेरी लावली.

सलग चारवेळा नगरसेवक असलेले अहफाज अहमद हे कामठीतील फुटाणा आळीत राहतात. अहफाज यांना शहबाज, बाबू व अयाज अशी तीन मुले आहेत. 2000 मध्ये त्यांच्या घरी कन्यारत्न आले. परंतु, काळाने 2003 मध्ये ते हिरावले. घरी मुलगी नसल्याने घराला घरपण आल्यासारखे त्यांना वाटत नव्हते. म्हणून त्यांनी दुसरीकडील मुलगी दत्तक न घेता शेजारील ढिवर समाजाचे चाचेरे परिवारातील सुषमा नावाच्या मुलीला पालकत्व देण्याचा निर्णय घेतला. 

सुषमा मोठी झाल्याने अहफाज यांना तिच्या लग्‍नाची काळजी वाटू लागली. तिचे लग्‍न हिंदूशी की मुस्लिमाशी करायचे, त्यांना विचार पडला. मग त्यांनी सुषमाच्या आई-वडिलांची भेट घेतली. तिच्या लग्‍नाचा विषय मांडला. त्यांनी अहफाज यांना पूर्ण अधिकार देत सर्व जबाबदारी तुमच्यावर असल्याचे सांगितले. अहफाज यांनी पित्याची भूमिका निभावत रविदासनगर येथील नरेश चांदनिया या युवकाचे स्थळ शोधले. लग्‍नसंबंध जोडले. नरेश हा मेकॅनिक आहे. लग्‍नाची तिथी काढून विधिवत हिंदू पद्धतीने हा सोहळा पार पडला. 

अहफाज यांनी सुषमाचे कन्यादान केले. या सोहळ्याला अहमद परिवार व त्यांचे संपूर्ण आप्तस्वकीय हजर होते. सुषमा सासरी जातानाही अहफाज यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा होत्या.