Mon, Mar 25, 2019 17:28होमपेज › Vidarbha › मुंबईच्या काळ्या यादीतील कंत्राटदाराला नागपुरात काम

मुंबईच्या काळ्या यादीतील कंत्राटदाराला नागपुरात काम

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 20 2018 1:08AMनागपूर : प्रतिनिधी

मुंबईतील आर. पी. एस. शहा इन्फ्रा प्रोजेक्ट या काळ्या यादीत असलेल्या कंपनीला नागपुरातील सिंमेट रस्ते बांधण्याचे काम का देण्यात आले? मुंबई उच्च न्यायालयाने या शहा कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. यानंतरही शहा यांना रस्त्याचे कंत्राट का दिले? आजपर्यंत शहा यांना किती अतिरिक्त पैसा दिला, अशी विचारणा नागपूर खंडपीठाने केली. जर शहा यांना अतिरिक्त पैसा दिला गेला असेल तर महापालिका आयुक्त आणि मुख्य अभियंता यांच्या वेतनातून पैसे कपात करावेत, असे आदेश न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झेड. ए. हक यांनी दिलेत.

उच्च न्यायालयाने महापालिका, नासुप्र आणि शहा यांना दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. शहा इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीचे कंत्राट रद्द करावे आणि त्यांनी नागपुरात केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मनीषा पापडकर यांनी दाखल केली आहे.

नागपुरातील काही ठिकाणचे महत्त्वाचे रस्ते या कंपनीने बांधले आहेत. मुंबईप्रमाणे नागपुरातील रस्तेही निकृष्ट दर्जाचे बांधण्यात येणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. मनीषा पापडकर यांच्यातर्फे अ‍ॅड. विलास डोंगरे, महापालिकेतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक, नासुप्रतर्फे  काझी, शहा कंपनीतर्फे  आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.