Sat, Jul 20, 2019 13:26होमपेज › Vidarbha › लग्‍नाच्या चौथ्या वाढदिवसापूर्वीच मेजर मोहरकर यांना वीरमरण

लग्‍नाच्या चौथ्या वाढदिवसापूर्वीच मेजर मोहरकर यांना वीरमरण

Published On: Dec 25 2017 1:17AM | Last Updated: Dec 25 2017 12:11AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भंडारा जिल्ह्यातील जवान मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर (वय 32) यांना वीरमरण आल्याने भंडारा जिल्ह्यावर  शोककळा पसरली आहे. चार जानेवरीला त्यांच्या लग्‍नाला चार वर्षे पूर्ण होणार होती, त्यापूर्वीच त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे.

शनिवारी या घटनेची माहिती जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली, तेव्हा त्यांची पत्नी माहेरी पुणे येथे होती आणि आई-वडीलही पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, माहिती मिळताच पूलगाववरून परत आले. मूळचे पवनी तालुक्यातील पवनी शहरात राहणारे प्रफुल्ल यांचे प्राथमिक शिक्षण जुनोना गावात झाले, तर माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतरचे संपूर्ण शिक्षण बाहेरच झाले. 12 वीनंतर इंजिनिअरिंग केले. मात्र, देशसेवेचे ध्येय असल्याने इंजिनिअरिंग सोडून त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश मिळविला. आठ वर्षांपूर्वी त्यांची लेफ्टनंट म्हणून आर्मीत भरती झाली होती. पदोन्‍नती होऊन ते मेजर पदावर गेले होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचे अबोली मोहनकर यांच्याशी लग्‍न झाले. त्यांचे वडील अंबादास मोहरकर सेवानिवृत्त शिक्षक आहेत, तर आई शिक्षिका आहेत. लहान भाऊ परेश मोहरकर पुण्यात नोकरी करतो.

प्रफुल्लविषयी त्यांच्या आईला विचारले असता त्यांनी सांगितले की, तो सुरुवातीपासूनच हुशार होता आणि त्याला देशसेवा करण्याची इच्छा होती.  तिथे जर वीरमरण आले, तर त्याचा मला गर्व असेल. त्यामुळे आज मला त्याचे शब्द आठवत आहेत. मला अभिमान आहे माझा मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा. मात्र, हे सांगताना ती माता आपल्या लेकरासाठी हंबरडा फोडत होती.

सैन्यातील मोठमोठ्या पदांवर जावून देशसेवेचे प्रफुल्ल मोहरकरांचे स्वप्न होते. त्यासंबंधित एक परीक्षा तो देणार होता. म्हणूनच दिवाळीच्या दिवसात महिनाभर पवनीत होता. त्याने कसून अभ्यास केला. ही परीक्षा उत्तीर्ण होणारच, हा त्याचा आत्मविश्‍वास ऊर्जा देणारा होता, असे त्याचे शेजारी खोब्रागडे यांनी सांगितले; पण त्याच्या अवचित जाण्याने स्वप्न अपूर्ण राहिले आहे.