Tue, Apr 23, 2019 19:41होमपेज › Vidarbha › महाराष्ट्राने दिल्ली सरकारचा आदर्श घ्यावा : श्रीपाद जोशी 

महाराष्ट्राने दिल्ली सरकारचा आदर्श घ्यावा : श्रीपाद जोशी 

Published On: Sep 06 2018 7:26PM | Last Updated: Sep 06 2018 7:24PMनागपूर : प्रतिनिधी

राज्यातील मराठी शाळा वाचण्यासाठी आणि शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिल्ली सरकारचा आदर्श बाळगावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले. तर तसे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना पाठविले.

दिल्ली सरकारने एकूण बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी २६ टक्याची तरतूद केली आहे. याशिवाय शिक्षकांवर शिक्षणबाह्य कामे न लादता केवळ शिक्षणाला प्राधान्य दिले जाते, प्रत्येक शाळेत व्यवस्थापनाचा भार कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेत इस्टेट मॅनेजर पद निर्माण करून लष्करातील निवृत्त जवानांना त्यात प्राधान्य देण्यात येत आहे, पालकांना शाळेच्या कामात सहभागी करून घेतले जाते, सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल, जिम, एसी मल्टीपर्पज हॉल, अत्याधुनिक स्टेडियमची सुविधा देण्यात येत आहे, व्यावसायिक शिक्षण आणि हॅप्पीनेस क्लासची संकल्पनाही राबविली आहे. यासारख्या व्यवस्थेमुळे तेथील सरकारी शाळा खाजगी शाळांना टक्कर देत असून आपल्या पाल्यांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश देऊ इच्छिणाऱ्या पालकांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली आहे.

सरकारी शाळा बंद पडण्यापासून रोखणारे व आपल्या भाषांचे जतन, संवर्धन करणारे काम करता येऊ शकते हा विश्वास त्यांनी निर्माण केला आहे. दिल्लीसारखे नगर राज्य असलेल्या सरकारने हे प्रत्यक्षात करून दाखविले तेव्हा आपल्या राज्यात ते का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे दिल्लीचा आदर्श घेऊन त्यांनी राबविलेले धोरण महाराष्ट्र शासनानेही स्वीकारावे, असे आवाहन डॉ. जोशी यांनी पत्राद्वारे केले आहे.