आरोग्यमंत्री राजेश टोपे आज अकोल्यात

Last Updated: Jun 03 2020 10:48AM
Responsive image
आरोग्यमंत्री राजेश टोपे


नागपूर : पुढारी वृत्तसेवा

राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद नंतर विदर्भातील अकोला जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहे. याची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून अकोल्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज ३ जूनला अकोला येथे येत आहेत. विदर्भात कोरोनाच्या रूग्ण संख्येत अकोल्याने नागपूरलाही मागे टाकले. मागील ६० दिवसाच्या कालावधीत अकोल्यातील कोरोनाची रूग्ण संख्या ६०० च्या पार गेली आहे.

अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या ६२७ झाली आहे. तर ३४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ४६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर १३१ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. अकोल्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे उद्या ३ जूनला एक दिवसाच्या अकोला दौर्‍यावर येत आहे. आज दुपारी ४: ३० ते सायंकाळी ७: ३० च्या दरम्यान अकोला जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची ते बैठक घेणार आहेत.

अकोला जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात ते आढावा घेणार आहेत. तसेच ते अकोल्यातील प्रतिबंधित क्षेत्राला भेटही देणार आहेत. कोरोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता अकोल्यात सहा दिवस कडकडीत जनता कर्फ्यू लावावा अशा आशयाचा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविला असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी या पुर्वीच सांगितले आहे. या प्रस्तावावर आरोग्यमंत्री उद्या काही निर्णय घोषित करतात का याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.