Fri, Jul 19, 2019 19:52होमपेज › Vidarbha › भाजपच्या दबावानंतरही जानकरांचा रासपकडून अर्ज 

भाजपचा दबाव तरीही जानकरांचा रासपकडून अर्ज

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 1:35AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असताना गुरुवारी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी भाजपचा दबाव असतानाही रासपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. जानकर यांच्या या पवित्र्यामुळे भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा अर्ज भरला. त्यामुळे शेकापच्या जयंत पाटील यांची धाकधूक वाढली. 

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी भाजपने पाच उमेदवारांचे अर्ज भरले. मात्र, भाजपच्या यादीत महादेव जानकर यांचा समावेश असतानाही जानकर यांनी आपण भाजपचे नव्हे तर रासपचे उमेदवार म्हणून अर्ज भरू, असा पवित्रा घेतला. गेली दोन दिवस जानकर यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समजूत काढूनही जानकर रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. मी प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देतो आणि तुमच्यासोबत रहातो, अशी भूमिका त्यांनी घेतली. शेवटी मुख्यमंत्र्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर जानकर यांचा हट्ट मान्य केला. जानकर यांनी उमेदवारी नाकारल्याने भाजपला अखेरच्या तासात सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला.

जानकर यांच्या उमेदवारीचे समर्थन करत सहयोगी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना मान्यता दिल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मात्र, जानकर भाजपची उमेदवारी घेत नाहीत असा निरोप अमित शहा यांना दिल्यानंतर त्यांनी पक्षाचा उमेदवार देण्यास सांगितल्याने निवडणुकीची समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करीत असून भाजपच्या संसदीय मंडळाकडून जानकर यांच्या उमेदवारीला मंजुरी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास पृथ्वीराज देशमुख यांचा अर्ज माघारी घेतला जाऊ शकतो.