Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Vidarbha › आमदार देशमुख नाना पटोलेंच्या वाटेवर?

आमदार देशमुख नाना पटोलेंच्या वाटेवर?

Published On: Dec 26 2017 7:29PM | Last Updated: Dec 26 2017 7:29PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेगळ्या विदर्भाची आठवण करून देणारे पत्र लिहून भाजपला घरचा आहेर देणारे व संघाच्या बौद्धिकला दांडी मारणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी नोटीसला अद्याप उत्तर दिलेले नाही. विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचे संकेत त्यांनी या माध्यमातून दिले आहे. दरम्यान, स्वतंत्र विदर्भासाठी राजकीय इच्छाशक्तीच नसल्याची टीका आमदार देशमुख यांनी केली आहे.

राज्यात सत्ता परिवर्तनानंतर सुरू झालेल्या पायंड्यानुसार भाजपचे सर्व मंत्री व विधिमंडळातील सदस्य हिवाळी अधिवेशन काळात रेशीमबागेतील स्मृती मंदिरास भेट देऊन दर्शन घेतात. तसेच, बौद्धिकदेखील होते. बौद्धिकला हजेरीसाठी पक्षाकडून व्हीप जारी करण्यात येतो. त्यामुळे सर्वांना आवर्जून हजेरी लावणे बंधनकारक होते. मात्र, काही महत्त्वपूर्ण काम किंवा पूर्वसूचना देऊन गैरहजर राहण्याची मुभा आहे. त्यामुळे हजेरी लावणे शक्य नसलेल्या सदस्यांनी मुख्य प्रतोद राज पुरोहित यांना आधीच कळवले.

यंदाच्या बौद्धिकला माजी मंत्री एकनाथ खडसे, आशिष देशमुख यांच्यासह बर्‍याच सदस्यांनी दांडी मारली. काही नेत्यांनी नंतर गैरहजेरीचे कारण समोर केले. मात्र, आशिष देशमुख यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पक्षाच्या वतीने त्यांना त्याच दिवशी नोटीस बजावण्यात आली. त्याचे उत्तर दुसर्‍याच दिवशी देण्याचे नमूद करण्यात आले. नोटीस मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आशिष देशमुख यांनी, 'योग्यवेळी उत्तर देऊ,' असे स्पष्ट केले होते. 

पाच दिवस झाले तरी, देशमुख यांनी नोटीसला अद्याप उत्तर न देता विदर्भावरील अन्याय आणि वेगळ्या राज्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे आव्हान पक्षाला दिले आहे. नाना पटोले यांनी पंधरवड्यापूर्वीच भाजपला रामराम करून लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ आशिष देशमुख यांनी पक्षाच्या धोरणाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असल्याने पक्षातील आणखी किती `नाना` वाटेवर आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. आशिष देशमुख यांच्यावर पक्षाने अद्याप कुठलीच कारवाई केलेली नाही. उत्तर आल्यानंतर पक्ष पातळीवर त्याचा विचार करण्यात येईल, असे भाजपच्या एका नेत्याने स्पष्ट केले.