नागपूर : विशेष प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विधानसभेतील आपआपल्या संख्याबळानुसार सर्वच पक्षांनी उमेदवार जाहीर केले असल्याने या निवडणुकीत घोडाबाजाराला लगाम बसणार आहे.
11 जागांमध्ये सत्ताधारी भाजपच्या सर्वाधिक 5 शिवसेना 2, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1 तर शेकाप 1 मिळून 11 उमेदवार जाहीर झाले आहेत. भाजप अतिरिक्त उमेदवार देईल अशी चर्चा होती. मात्र, भाजपने संख्याबळाप्रमाणे उमेदवार जाहीर केले. या निवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, निवडणूक बिनविरोध होणार असल्याने सर्वच हा अंदाज खोटा ठरला. तसेच गेल्या काही वर्षांत निवडणूक बिनविरोध होण्याची परंपराही कायम राखली जाणार आहे.
जातीय समिकरणे तेजीत
निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जातीय समीकरणे साधली आहेत. भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे सहयोगी आमदार व पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांच्यासह भाजपचा दलित चेहरा असलेल्या भाई गिरकर यांना उमेदवारी दिली आहे. या शिवाय मराठा समाजाचे राम पाटील - रातोळीकर, ठाणे जिल्यातील कोळी समाजाचे रमेश पाटील आणि माजी मुख्यमंत्री सुशाकरराव नाईक यांचे पुतणे व बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी निलय नाईक यांना उमेदवारी घोषित केली आहे. मात्र, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, बीडमधील नेते रमेश आडसकर यांचा पत्ता कटला आहे.
शिवसेनेकडून विद्यमान आमदार अनिल परब व मनीषा कायंदे यांना संधी देण्यात आली आहे. परब यांचे नाव निश्चित होते. मात्र मिलिंद नार्वेकर यांची चर्चा असताना प्रा. मनीषा कायंदे यांना संधी देण्यात आली. काँग्रेसने शरद रणपिसे यांना पुन्हा संधी देत यवतमाळमधील गुलाम नबी आझाद यांचे कट्टर समर्थक वजाहद मिर्झा या नव्या चेहर्याला संधी दिली आहे. त्यामुळे विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा पत्ता कापला गेला आहे. राष्ट्रवादीने बाबाजानी दुर्रानी यांची उमेदवारी घोषित केली आहे. तर शेकापच्या जयंत पाटील हे काँग्रेस- राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवारी अखेरचा दिवस आहे. तर 16 जुलै रोजी आवश्यक असल्यास मतदान होणार आहे.