Thu, Apr 25, 2019 07:59होमपेज › Vidarbha › हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ

Published On: Dec 12 2017 2:31AM | Last Updated: Dec 12 2017 2:31AM

बुकमार्क करा

नागपूर : चंदन शिरवाळे

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत सरकार आणि विरोधकांमध्ये वार-पलटवार झाले. कोणी किती कर्जमाफी दिली, हे सांगण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याने सभागृहाचा आखाडा झाला. अखेर गोंधळातच शोकप्रस्ताव पुकारण्यात आला आणि नंतर कामकाज तहकूब करण्यात आले.

खरोखरच 41 लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली असल्यास सरकारने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभरच काय एक हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची सरकारची तयारी असल्याचे प्रतिआव्हान दिले. शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे काँग्रेस आघाडी सरकारचे पाप आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर पलटवारही केला.

सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात होताच विखे-पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आम्हाला कर्जमाफी विषयावर बोलण्यासाठी स्थगन प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी विखे यांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली होती; पण ती  अमान्य झाली. मात्र, कर्जमाफी महत्त्वाची असल्यामुळे आपणास बोलण्यास देत असल्याचे बागडे यांनी स्पष्ट केले.

विखे म्हणाले, कर्जमाफी न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. कर्जमाफी योजनेत समावेश न झालेले वाशिम जिल्ह्यातील शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ नावाच्या शेतकर्‍याने आत्महत्या केली, असे सांगत या शेतकर्‍याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातील काही मजकूर वाचून दाखवला. आघाडी सरकारच्या कार्यकाळापासून शेतकर्‍यांची अवस्था वाईट झाली आहे. कर्जबाजारी शेतकरी हे तुमचेच पाप आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला.