Wed, Jun 03, 2020 03:46होमपेज › Vidarbha › कोळीवाड्यांच्या जागा नावावर करणार

कोळीवाड्यांच्या जागा नावावर करणार

Published On: Jul 21 2018 1:34AM | Last Updated: Jul 21 2018 1:21AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

मुंबईसह ठाणे, पालघर परिसरातील शासकीय जमिनीवर वसलेल्या कोळीवाड्यांतील राहत्या घरांच्या जागा रहिवाशांच्या नावावर करण्यात येतील, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. मच्छीमार मासे सुकविण्यासाठी ज्या जागेचा वापर करतात त्या जागा अन्य कोणत्याही कामासाठी वापरण्यात येणार नाहीत,असेही त्यांनी जाहीर केले.

मासे पकडणारी जाळी सुकविणे, जाळी विणणे, मासे सुकविणे, बोटी शाकारणे, बोटी दुरुस्त करणे यासाठी मच्छीमारांच्या वसाहतीलगत किंवा गावालगत मोकळी जागा असणे अत्यावश्यक आहे. मच्छीमारांच्या वसाहतीलगतच्या सोयीस्कर खुल्या जागा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 22 अन्वये तरतुदीनुसार विहित करण्यास हरकत नसावी, असा निर्णय सरकारनेे घेतला होता. तरीही मोकळ्या जागांचे वाटप अन्य कारणासाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे कारण दाखवून अशा जागा मच्छिमारांना वापर करण्यास सरकारकडून विरोध होत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की , कोळीवाड्यातील राहत्या घरांच्या जागा त्यात्या रहिवाशांच्या नावावर करण्यात येतील तसेच ज्या जागा मासे सुकवण्यासाठी आणि जाळी विणण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्या जागा अन्य कोणत्याही कामासाठी वापरण्यात येऊ नये अशा सूचना सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात येतील.

अडीच ते तीन लाख रहिवाशांना लाभ

मुंबईत सुमारे 40 कोळीवाडे असून त्यातील 36 कोळीवाडे हे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनीवर आहेत. या कोळीवाड्यांचे आजपर्यंत सीमांकन झालेले नाही. मुंबईचा नवा विकास आराखडा तयार होण्यापूर्वीच याचे सीमांकन करा, असा आग्रह शेलार यांनी सुरुवातीपासून धरला होता. आता कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यास सुरुवात झाल्याने विभागाच्या निर्णयाचा लाभ मुंबईतील सुमारे अडीच ते तीन लाख रहिवाशांना होणार आहे.