Mon, May 27, 2019 01:12होमपेज › Vidarbha › वैद्यकीय प्रवेशात ओबीसी आरक्षण अबाधित ठेवा

वैद्यकीय प्रवेशात ओबीसी आरक्षण अबाधित ठेवा

Published On: Jul 18 2018 1:55AM | Last Updated: Jul 18 2018 1:48AMनागपूर : प्रतिनिधी

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील केंद्र सरकारच्या 15 टक्के कोट्यात महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय ओबीसी महासंघ व ओबीसी विद्यार्थिनी राधिका राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्‍का पोहोचेल, असे कुठलेही कृत्य वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये करू नका, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. 

राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील आरक्षण धोरणावर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणे अनिवार्य आहे. मात्र, महाराष्ट्रातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील 4,064 जागांपैकी केवळ 1.7 टक्के म्हणजे 69 जागा ओबीसींना देण्यात आल्या आहेत. तर केंद्रीय कोट्यात ओबीसींना एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया अवैध घोषित करण्यात यावी, केंद्रीय कोट्यासाठी 20 व 21 जून रोजी झालेली पहिली फेरी रद्द करण्यात यावी, नियमांचे काटेकोर पालन करून नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी विनंती या याचिकेत करण्यात आलेली आहे. 

याचिकाकर्त्या विद्यार्थिनीने 6 जून 2018 रोजी झालेल्या ‘नीट’ परीक्षेत 473 गुण मिळविले आहेत. तिला केंद्राच्या कोट्यातून वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश हवा आहे. याप्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने वरील निर्देश दिले. तसेच यावर शासनाला गुरुवारपर्यंत शपथपत्र दाखल करण्यास सांगितले.