Mon, Sep 24, 2018 17:18होमपेज › Vidarbha › बिंदू नामावलीप्रमाणेच नोकरभरती : राज्यमंत्री दादा भुसे 

बिंदू नामावलीप्रमाणेच नोकरभरती : राज्यमंत्री दादा भुसे 

Published On: Jul 14 2018 12:57AM | Last Updated: Jul 14 2018 12:57AMनागपूर ः विशेष प्रतिनिधी

येत्या सहा महिन्यांत रोस्टर दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार असून, यापुढे बिंदू नामावलीप्रमाणेच नोकरभरती केली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

विधान परिषद सदस्य विनायक मेटे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते. मेटे म्हणाले, बीड जिल्हा परिषदेत सदोष बिंदू नामावलीमुळे मागास व खुल्या प्रवर्गातील शिक्षक कर्मचार्‍यांवर अन्याय होत आहे. याविरोधात विविध कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्‍त कार्यालयातील उपायुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली बिंदू नामावलीची चौकशी करण्यासाठी समिती गठित केली असून, ही समिती येत्या तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे. जात प्रमाणपत्रांची पडताळणी नसलेल्या 133 हून अधिक शिक्षकांना बेकादेशीररीत्या खुल्या प्रवर्गात पदस्थापना दिली आहे. जिल्हा परिषदेकडे निवड सूची नसल्याचाही मुद्दा मेटे यांनी आपल्या लक्षवेधीद्वारे मांडला.

राज्यमंत्री भुसे म्हणाले, सध्या 34 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांचे उर्वरित ठिकाणी रोस्टर सुधारण्याचे काम सुरू आहे. मागासवर्गीय कक्षाच्या मार्गदर्शनानुसार रोस्टरबाबतच्या तक्रारींची दुरुस्ती केली जाईल. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी मागासवर्गीयांनंतर खुल्या वर्गातील उमेदवारांची नोकरभरती केली जात असल्याबाबत खंत व्यक्‍त केली. तर जोपर्यंत खुल्या वर्गातील पदे भरली जात नाहीत, तोपर्यंत मागास उमेदवारांना घेतले जात नसल्याकडे लक्ष वेधले. जयदेव गायकवाड यांनी मेरिटमध्ये आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या वर्गातून नोकरी देण्याची मागणी केली.