Sat, Apr 20, 2019 18:33होमपेज › Vidarbha › फवारणी करताना मजुराला विषबाधा; शेतकर्‍याला बजावली नोटीस

फवारणी करताना मजुराला विषबाधा; शेतकर्‍याला बजावली नोटीस

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 8:47PMनागपूर : प्रतिनिधी

कीटक नाशकाच्या फवारणी दरम्यान शेतमजुराला विषबाधा झाल्याने संबंधित शेतकर्‍याला जबाबदार धरत नोटीस बजावण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे तहसीलदार रवींद्र जोशी यांनी संबंधित शेतकर्‍याला ही नोटीस बजावली. अंकुश बंडू भोयर (वय ३०)असे या  विषबाधा झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. तर संबंधित शेतकऱ्यास मजुराच्या जिवितास धोका पोहोचविल्याचा आरोप करीत तीन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात प्रथमच अशा प्रकारची कारवाई होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कीटकनाशक फवारणीच्यावेळी विषबाधा होऊन गेल्या वर्षी जिल्ह्यात २२ जणांचा मृत्यू झाला. यातील पिडीत कुंटुंबीयांना न्यायालयाच्या आदेशानंतर ४ लाखांची मदत देण्यात आली. दरम्यान, अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी ज्या शेतकऱ्याच्या शेतात फवारणी असेल त्याने सर्व काळजी घेतली पाहिजे, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार फवारणी करताना मजुराला विषबाधा होऊ नये,यासाठी मजुराला संरक्षक किट देण्याची जबाबदारी संबंधित शेतकर्‍याची होती.

दरम्यान, नोटीस बजावण्यात आलेल्या या घटनेत वणी तालुक्यातील तेजापूर येथील अंकुश बंडू भोयर या शेतमजुराला २१ ऑगस्ट रोजी फवारणी करताना विषबाधा झाली होती. त्याला वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकाराच्या चौकशीनंतर अंकुशला फवारणी करताना शेतकरी विजय लक्ष्मण मारेकऱ्याने संरक्षक किट पुरविली नव्हती. तसेच, फवारणीसाठी वापरलेले कीटकनाशक अतिजहाल, प्रतिबंधित व अनधिकृत असल्याचे आढळून आले. मात्र, याकडे शेतकरी विजय मारेकऱ्यांने दुर्लक्ष केल्याने परिणामी मजुराला विषबाधा झाली आहे. याबाबत वणीचे तहसीलदार रवींद्र जोशी म्हणाले, ’विजय मालेकर या शेतकर्‍याने फवारणी करताना योग्य काळजी घेतली असती तर अंकुश भोयर याला विषबाधा झाली नसती. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी दुर्घटना होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. या शेतकर्‍याला नोटीस बजावल्याने इतर शेतकरीसावध होतील’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.