होमपेज › Vidarbha › मुख्यमंत्र्यांना त्यांचे सहकारी साथ देत नाहीत : आव्हाड

मुख्यमंत्र्यांना त्यांचे सहकारी साथ देत नाहीत : आव्हाड

Published On: Feb 11 2018 7:01PM | Last Updated: Feb 11 2018 7:01PMनागपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या आपली लढाई एकट्याने लढत असून त्यांच्या मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी त्यांना बिलकुल साथ देत नाहीत, तर त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करून त्याचा विकृत आनंद लुटत आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी नागपुरात केला.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी संघटनेच्या एका कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांच्या कारभाराबद्दल बोलताना ते म्हणाले की, फडणवीस कामाला चांगले असले तरी त्यांच्याजवळ चांगली टीम नाही. त्यांचे सर्व सहकारी फक्‍त मजा बघण्याचे काम करतात. फडणवीसांचे गत चार वर्षांत सर्वच नियोजन फसल्याचा दावा करीत चौथ्यावर्षीदेखील त्यांची गाडी चौथा गियर घेऊ शकत नाही, तर ती गाडी उलट दिशेने घरंगळते आहे, असे ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका करीत राहुल गांधींना मात्र आव्हाडांनी उचलून धरले. हा देश मोदी चालवू शकतात, तर राहुल गांधींना चालवायला काय हरकत आहे, असा सवाल करीत फॅसिस्ट मानसिकतेने त्यांना वेडा ठरवण्याचा यशस्वी प्रयत्न केला, असा आरोप आव्हाड यांनी यावेळी केला. मोदी देशाचे पंतप्रधान झाले; पण त्यांना इतिहासाचा अभ्यासही नाही, याकडे लक्ष वेधत परवाचे मोदींचे संसदेतील भाषण त्याचेच प्रतीक होते, असेही आव्हाडांनी ठणकावले. सुशिक्षित बेरोजगारांना पकोडे विकायला सांगणे हा आपल्या देशातल्या शिक्षण पद्धतीचा अपमान असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.