Sat, Aug 17, 2019 16:14होमपेज › Vidarbha ›

अजित पवारांच्या अडचणीत वाढ
 

अजित पवारांच्या अडचणीत वाढ
 

Published On: Apr 05 2018 2:11AM | Last Updated: Apr 05 2018 12:57AMनागपूर : प्रतिनिधी

राज्यात गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप असणारे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापुढील अडचणी आता वाढल्या आहेत.
राज्य सरकारने घोटाळ्याचा सखोल तपास करण्यासाठी व प्रकरणाचा तातडीने सोक्षमोक्ष लावण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर व अमरावती परिक्षेत्राकरिता वेगवेगळी दोन विशेष तपास पथके (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारतर्फे आज उच्च न्यायालयात यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

नागपूर व अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक (एसीबी) एसआयटीचे प्रमुख राहतील. त्यांना अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक सहकार्य करतील व प्रत्येक अतिरिक्‍त पोलिस अधीक्षकाच्या नेतृत्वाखाली तीन पोलिस उपअधीक्षक, आठ पोलीस निरीक्षक व आवश्यक पोलीस कर्मचार्‍यांचे पथक कार्य करेल. तपास वेगात व योग्यरीत्या पूर्ण व्हावा, याकरिता पथकाला आवश्यक कायदेशीर व तांत्रिक सहकार्य पुरविले जाणार आहे.