Mon, Aug 19, 2019 07:35होमपेज › Vidarbha › पहारीने घाव घालून कुटुंबातील पाच जणांचे अमानुष हत्याकांड

पहारीने घाव घालून कुटुंबातील पाच जणांचे अमानुष हत्याकांड

Published On: Jun 11 2018 8:03PM | Last Updated: Jun 11 2018 7:49PMनागपूर : प्रतिनिधी

एकाच कुटुंबातील पाच जणांची पहाटे गाढ निद्रेत असताना पहारीने डोक्यात वार घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना नागपुरातील नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत दिघोरी परिसरातील नवीन आराधनानगर येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. या प्रकरणात मृताचा मेहुणा हाच प्रमुख आरोपी असून, तो फरार झाला आहे. त्याच्या तपासासाठी नऊ पथके रवाना झाली आहेत.

मृतांत कमलाकर पवनकर (48), पत्नी अर्चना पवनकर (45), आई मीरा पवनकर (78), मुलगी वेदांती पवनकर (12) आणि आरोपीचा मुलगा कृष्णा ऊर्फ गणेश पालटकर (2) यांचा समावेश आहे. निर्घृण हत्याकांडातून बचावलेल्यांमध्ये कमलाकर पवनकर यांची मुलगी वैष्णवी पवनकर (7) आणि भाची मिताली पालटकर (12) यांचा समावेश आहे.

या प्रकरणात अर्चना पोहनकरचा भाऊ असलेल्या विवेक पालटकरनेच या हत्या केल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यादिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे आरोपी विवेकने त्याच्या स्वत:च्या मुलालाही ठार मारले आहे.

कमलाकर पोहनकर हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ता होते. त्यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय असून, वैष्णवी इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स तसेच झेरॉक्स आणि लॅमिनेशनचे दुकान आहे. दुकान चालविण्यात त्यांची मुलगी वेदांती वडील कमलाकर यांना सहकार्य करायची.

कमलाकर यांच्यासोबत कृष्णा पालटकर आणि मिताली पालटकर हे दोघे भाऊ-बहीणही राहत होते, हे दोेघेही आरोपी विवेकची मुले आहेत. मूळचा भंडारा जिल्ह्यातील नवरगाव येथील रहिवाशी असलेल्या आरोपी विवेक पालटकरने दोन वर्षांपूर्वी चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या केली होती. यावेळी त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयात अपील केल्यावर ही शिक्षा पाच वर्षांच्या सक्‍तमजुरीत परिवर्तीत झाली होती. शिक्षा पूर्ण करून तो दोन महिन्यांपूर्वीच सुटला होता.  आई मरण पावल्याने आणि वडील कारागृहात गेल्याने अनाथ झालेल्या कृष्णा व मितालीला विवेकची बहीण अर्चनाने स्वत: आपल्याजवळ आणून सांभाळ करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार ही भावंडे येथेच रहात होती.

चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे असलेल्या वडिलोपार्जित 10 एकर जमिनीच्या हिस्सेवाटणीवरून आरोपी विवेकचा आणि बहीण अर्चनाचा वाद सुरू होता. बहिणीने हिस्सा सोडण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने तिला कुटुंबासह जीवे मारण्याचा कट रचला होता. त्यानुसार सोमवारी पहाटेच्या सुमारास पोहनकर कुटुंबातील चार आणि स्वतःच्या मुलावर पहारीने वार करून ठार केले. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याच कुटुंबातील दोन मुली झोपेतून उठल्या असता, ही घटना उघडकीस आली.