Thu, Apr 25, 2019 07:29होमपेज › Vidarbha › एचएससी, सीबीएसईची काठिण्य पातळी तपासणार : तावडे

एचएससी, सीबीएसईची काठिण्य पातळी तपासणार : तावडे

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 10 2018 1:04AMनागपूर : विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (एचएससी) विद्यार्थी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडू नयेत म्हणून या दोन्ही अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी तपासणीच्या द‍ृष्टीने शिक्षणतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली. दिवाळीआधी ही समिती अहवाल सादर करेल, असेही ते म्हणाले. 

राज्यातील सीबीएसईच्या निकालात एचएससी बोर्डाच्या तुलनेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे सुमारे 5 टक्क्याने वाढले असून, त्यामुळे सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविताना एचएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागते, त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची लक्षवेधी सूचना सुनील प्रभू, अबू आझमी या सदस्यांनी विधानसभेत मांडली होती. 

या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये एचएससी बोर्डाबरोबरच सीबीएसई, आयसीएसई, आयबी या अभ्यासक्रमाचेही मंडळ आहे.  या मंडळामध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी शिक्षण घेतात. या दोन्ही मंडळाच्या काठिण्य पातळीमध्ये फारसी तफावत नाही. सीबीएसई आदी मंडळाच्या विद्यार्थ्यांना 500 पैकी गुण असतात तर एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 650 पैकी गुण देण्यात येतात.

तरीही दोन्ही मंडळांच्या काठिण्य पातळीची समानता तपासण्याच्याद‍ृष्टीने शिक्षणतज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल, समितीच्या अहवालावर घेण्यात येणारा निर्णय हा गुणवत्तेच्या आधारावर घेण्यात येईल, कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. तसेच आवश्यकता असेल तर येथेही बेस्ट ऑफ फाईव्ह फॉर्म्युला लागु करता येईल का याचाही विचार केला जाईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. अहवालमधील शिफारशीनंतर योग्य पर्यायांची शिक्षणतज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

11 वी प्रवेश घराजवळ देण्यासाठी समिती

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या घराच्याजवळ प्रवेश न मिळता तो अतिशय दूर मिळतो, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते, तरीही विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश देताना हे प्रवेश विद्यार्थ्यांच्या घराच्या जवळ मिळावेत, अशी मागणी राज पुरोहित यांनी केली असता, तावडे म्हणाले की नेबर हूड स्कूलिंग ही संकल्पना राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. त्यादृष्टीने यासंदर्भात अभ्यास करण्याच्यादृष्टीने एक समिती स्थापन करण्यात येईल. शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्‍त त्याचप्रमाणे सदनाचे सदस्य यांची एक समिती स्थापन करण्यात येईल. या समितीने दिलेल्या अहवालानंतर यासंदर्भात विचार करण्यात येईल,असे तावडे यांनी स्पष्ट केले.